टीम लोकमन जत |
जत विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार व सांगली लोकसभेसाठी सुरुवातीपासूनच संजयकाका पाटील यांच्या विरोधात भूमिका घेणारे विलासराव जगताप यांनी आज भारतीय जनता पार्टीचा राजीनामा देत काँग्रेसच्या विशाल पाटलांना पाठिंबा जाहीर केला आहे.
विलासराव जगताप यांच्या राजीनाम्याने जत विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी आणि संजयकाका पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. विलासराव जगताप यांच्या राजीनाम्याने सांगली जिल्ह्यामध्ये खळबळ निर्माण झाली असून विलासराव जगतापांचा समर्थनार्थ तालुकाध्यक्ष प्रमोद सावंत, जत शहराध्यक्ष अण्णा भिसे, युवा मोर्चाचे संग्राम भैया जगताप, लक्ष्मण बोराडे, राजू डफळे, राजू चौगुले यांनीही आपले सामूहिक राजीनामे दिले आहेत. यामुळे जत भाजपला मोठे खिंडार पडले आहे. जत तालुक्यामध्ये विलासराव जगताप यांचा स्वतंत्र गट असून जगतापांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांची तालुक्यात मोठी संख्या आहे.
दरम्यान विलासराव जगताप यांनी निर्णय जाहीर केल्यानंतर दुष्काळी फोरम दोन दिवसात विशाल पाटील यांच्या प्रचारात सक्रिय झालेला असेल असा ठाम दावा करण्यात येत आहे. विशाल पाटील मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी खासदार संजयकाका पाटील यांची राजकारणातील गद्दारी जाहीरपणे आपल्या समर्थकांसमोर मांडली. जगताप यांच्या निर्णयानंतर सांगली लोकसभा निवडणुकीला वेगळे वेळ लागले असून जगताप यांच्या निर्णयाने विशाल पाटलांना मोठे बळ मिळाले आहे. जगतापांच्या निर्णयाने सांगली लोकसभेसाठी आता चांगलीच चुरस निर्माण झालेली पाहायला मिळेल.
संजय काका पाटील आणि विलासराव जगताप यांच्यातील मतभेद गेल्या काही वर्षांपासून टोकाला गेल्याचे पाहायला मिळत आहेत. संजयकाका पाटील यांनी गत विधानसभा निवडणुकीत जगतापांना अंतर्गत धक्का दिल्याचा आरोप जगताप गटाने केला होता त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये मनोमिलन होण्याऐवजी अंतर वाढतच गेले. त्याचे पडसाद लोकसभा निवडणुकीत दिसू लागले आहेत.
भारतीय जनता पार्टीने सांगली लोकसभेसाठी संजयकाका पाटील यांना उमेदवारी देऊ नये अशी थेट मागणी विलासराव जगताप यांनी केली होती. परंतु भारतीय जनता पार्टीने तिसऱ्यांदा संजय काकापाटील यांना उमेदवारी देऊन विश्वास दाखवला. तेव्हापासून जगताप हे भाजपवर नाराज होते. त्यामुळे आगामी काळात जगतापांची भूमिका काय असणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. अखेर सोमवारी जत मध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेऊन विलासराव जगताप यांनी आपला निर्णय जाहीर केला. या बैठकीसाठी जत तालुक्यातून जगताप गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जगताप यांच्या निर्णयामुळे भारतीय जनता पार्टी आणि सांगली लोकसभेचे भाजपा उमेदवार संजयकाका पाटील यांना मोठा धक्का मानला जातो. आता मताधिक्य वाढविण्यासाठी संजयकाकांना कसरत करावी लागणार असून त्यांची दमछाक होणार हे मात्र नक्की.