टीम लोकमन अकलुज |
माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील राजसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज सायंकाळी साडेचार वाजता अकलूज येथे होणार आहे.
धैर्यशील मोहिते-पाटलांनी अतिशय साध्या पद्धतीने कोणताही गाजावाजा व शक्तीप्रदर्शन न करता आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर आज सायंकाळी साडेचार वाजता माढा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या व मोहिते पाटील समर्थकांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ होणार आहे.
हि निवडणूक मोहिते-पाटील परिवाराच्या अस्तित्वाची असून अनेक दिवसांपासून धैर्यशील मोहिते-पाटलांनी या मतदारसंघात तयारी केली असून त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे. भारतीय जनता पार्टीने उमेदवारी नाकारल्यानंतर मोहिते-पाटील कमलीचे नाराज झाले. या नाराजीमुळे त्यांनी भाजप सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवली. कोणत्याही परिस्थितीत माढा जिंकायचा असा चंग मोहिते-पाटील परिवाराने बांधला असून त्यांना फलटणच्या रामराजे नाईक निंबाळकर गटाची साथ मिळणार हे निश्चित आहे. करमाळ्याचे माजी आमदार नारायण आबा पाटील यांना आपल्या बाजूने खेचण्यात मध्ये पाटलांना यश आले आहे. पवारांच्या हाताला लागलेले उत्तमराव जानकर दबावामुळे नागपूरला जाऊन फडणवीसांना भेटले परंतु कार्यकर्ते भाजपसोबत न जाता तुतारी हाती घेण्याचा आग्रह करीत आहेत. त्यामुळे जाणकारांची कोंडी झाली असून ते काय निर्णय घेणार हे लवकरच कळेल. जानकर मोहिते पाटलांसोबत आले तर धैर्यशील मोहिते पाटलांना दिल्लीत जाणे सोपे होणार आहे.