टीम लोकमन मंगळवेढा |
गेल्या काही दिवसांपासून रिक्त असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या तालुकाध्यक्षपदावर आमदार समाधान आवताडे समर्थक अंबादास कुलकर्णी व शहराध्यक्षपदावर नागेश डोंगरे यांची निवड करण्यात आली आहे.
यापूर्वी तालुकाध्यक्षपदी गौरीशंकर बुरकुल व शहराध्यक्षपदी गोपाळ भगरे कार्यरत होते. बुरकुल व भगरे हे प्रशांत परिचारक गटाचे कार्यकर्ते होते. भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी कुलकर्णी व डोंगरे यांची निवड जाहीर केली.
अंबादास कुलकर्णी व नागेश डोंगरे अवताडे गटाचे कार्यकर्ते असून आमदार समाधान आवताडे यांचे विश्वासू शिलेदार म्हणून ओळखले जातात. समाधान आवताडे हे संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन असताना अंबादास कुलकर्णी हे व्हाईस चेअरमन होते. अंबादास कुलकर्णी यांचे हुलजंती गटात प्राबल्य असून त्यांनी यापूर्वी शिवनगी विकास सोसायटीचे चेअरमन, मंगळवेढा तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक यासह विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. कुलकर्णी हे शांत संयमी व कर्तव्यनिष्ठ म्हणून ओळखले जातात.
शहराध्यक्षपदी निवड झालेले नागेश डोंगरे हे भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. मंगळवेढा शहरात भारतीय जनता पार्टी तळागाळात पोचविण्यासाठी डोंगरे यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. ते आमदार समाधान आवताडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. भाजपच्या तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष या दोन्ही महत्त्वाच्या पदावर अवताडे समर्थकांची वर्णी लागल्याने आमदार समाधान आवताडे यांच्या गटात आनंदाचे वातावरण आहे. कुलकर्णी व डोंगरे यांच्या निवडीने मंगळवेढ्यातील भाजपवर आपलेच वर्चस्व असल्याचे आमदार समाधान आवताडे यांनी सिद्ध केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या निवडीमुळे कुलकर्णी व डोंगरे यांना महत्त्व प्राप्त झाले आहे.