टीम लोकमन मंगळवेढा |
रत्ननिधी फाऊंडेशन व रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल यांच्या वतीने जयपूर फुट कॅंप डिसेंबर २०२३ मध्ये आयोजित करण्यात आला होता. ज्या दिव्यांगांचे हात व पायाचे मोजमाप घेतले होते त्यांना कृत्रिम हात व पायांचे दि. १८ एप्रिल रोजी रामकृष्ण इंटरनॅशनल स्कूल, जळकोट रोड उदगीर येथे मोफत वितरण करण्यात आले.
यावेळी श्री हावगीस्वामी मठाचे मठाधीश श्री शंभूलिंग शिवाचार्य महाराज, उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर, रोटरी जिल्हा ३१३२ चे भावी प्रांतपाल सुधीर लातुरे, सक्षम दिव्यांग केंद्र उदगीरचे अध्यक्ष शंकरराव लासुणे, उदागिरबाबा मठाचे पुजारी किरण भारती महाराज, रोटरी डिस्ट्रिक्टचे प्रकल्प प्रमुख मेघराज बरबडे, रोटरी क्लब उदगीरच्या अध्यक्षा मंगला विश्वनाथे, सचिव सरस्वती चौधरी, प्रोजेक्ट चेअरमन विजयकुमार पारसेवार, यांची प्रमुख उपस्थिती होती.
रोटरीचे हे शिबीर सामाजिक बांधिलकी म्हणून सर्वसामान्य जनतेला उपयुक्त ठरेल असे मत यावेळी श्री. शंभूलिंग शिवाचार्य महाराज यांनी व्यक्त केले. जयपूर फुटच्या माध्यमातून दिव्यांगांना आत्मनिर्भर करण्यासाठी रोटरीने पुढाकार घेतला असून या क्लबच्या माध्यमातून स्नेह व आत्मियतेने सुरू असलेले काम समाजाला दिशादर्शक असल्याचे मत उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांनी व्यक्त केले. दिव्यांग व निराधार लोकांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा व अडचण आल्यास तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी तहसीलदार राम बोरगावकर यांनी केले. सुधीर लातुरे यांनी, रोटरी जागतिक स्तरावर वंचिताना आधार देण्याचे कार्य करत असून उदगीर रोटरी याची अतिशय प्रभावीपणे अंमलबजावणी करीत असल्याचे सांगून समाधान व्यक्त केले.
सदरील शिबीरात एकूण ८८ दिव्यागांना मोफत कृत्रिम हात, पाय व कुबड्या देण्यात आले. या वेळी रत्ननिधी फाऊंडेशन मुंबईचे तंत्रज्ञ सुमेध लव्हाळे, मनोज चव्हाण, राजेश माने, अदनान शेख, सक्षम दिव्यांग केंद्र उदगीरचे डॉ. संजय कुलकर्णी, डॉ. कालिदास बिरादार, प्राचार्य श्रीपाद सिमंतकर, रवी बेळकोणे व रोटरी क्लब उदगीरचे उपाध्यक्ष प्रशांत मांगुळकर, प्राचार्य डॉ. दत्तात्रय पाटील, विशाल जैन, डॉ. सुधीर जाधव, डॉ. मोहन वाघमारे, महानंदा सोनटक्के, सुनीता मदनुरे, डॉ. सुलोचना येरोळकर, ज्योती चौधरी, व्यंकटराव कणसे, विशाल तोंडचिरकर, प्रमोद शेटकार, संतोष फुलारी, लक्ष्मीकांत चिकटवार, रवींद्र हसरगुंडे, शिवप्रसाद बोळेगावे आदींची उपस्थिती होती.