टीम लोकमन मंगळवेढा |
महाराष्ट्रात पाच टप्प्यात लोकसभा निवडणूक घेण्याची भाजपची रणनीती फसली. याबाबत भाजपचं गणित पूर्णपणे चुकलं. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला फक्त 150 जागांवरच विजय मिळेल, असा दावा राज्याचे माजी मंत्री व शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी केला. ते सोमवारी रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी भास्कर जाधव यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला.
मी माझ्या संपूर्ण राजकीय जीवनात महाराष्ट्रात कधीही लोकसभा निवडणुकीचे पाच टप्प्यात मतदान झालेले पाहिले नाही. महाराष्ट्रातूनच केंद्रातील सरकार हद्दपार होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने पंतप्रधान मोदी यांना महाराष्ट्रात प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळावा, यासाठी पाच टप्प्यात निवडणुकीचे आयोजन करण्यात आले. माझ्या अनुभवानुसार, पाच टप्प्यांमध्ये लांबलेले मतदान भारतीय जनता पार्टीच्या विरोधात गेले. निवडणुकीच्या दोन टप्प्यानंतर भाजपने 400 पारची भाषा बंद केली. त्यानंतर भाजपची भाषणाची आणि प्रचाराची पातळी खालावत गेली. भाजपचा प्रचार भरकटत गेला. ते विषयाला धरुन बोलले नाहीत. या सगळ्यामुळे महाराष्ट्रातील सुसंस्कृत जनता दुखावली गेली. पंतप्रधान पदावरील व्यक्तीने अशाप्रकारची भाषण वापरणे कोणालाही अपेक्षित नव्हते. भाजपला पाच टप्प्यात निवडणूक घेण्याचा फायदा होईल, असे वाटले होते. पण भाजपचं हे गणित फसले, असेही भास्कर जाधव यांनी म्हटले.
लोकसभा निवडणूक संपल्यानंतर 1 जूनला एक्झिट पोलचे निष्कर्ष जाहीर होतील. पण त्यापूर्वीच काही गोपनीय सर्व्हे करण्यात आले आहेत. या गोपनीय सर्वेक्षणांचा कल पाहता मोदी सरकार लोकसभा निवडणुकीत 150 जागांचा आकडाही पार करणार नाही. तर इंडिया आघाडी लोकसभेच्या 350 पेक्षा जास्त जागा जिंकेल, असा दावाही भास्कर जाधव यांनी केला.
महाराष्ट्रात मंगळवारी पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडले. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांसह नाशिक, धुळे, दिंडोरी, पालघर, भिवंडी, ठाणे, कल्याण आणि पालघरमध्ये मतदान पार पडले. एकूणच झालेल्या मतदानाची टक्केवारी पाहता मुंबईत मतदानाचा फारसा उत्साह दिसून येत नाही. तर कांदा उत्पादकांचा परिसर असलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात देखील मतदारांमध्ये निरुत्साह दिसून येत आहे.