टीम लोकमन मंगळवेढा |
श्रीमंतांच्या यादीत भारतातील दोन उद्योगपतींमध्ये शर्यत सुरूच आहे. या यादीत पुन्हा एकदा मोठी उलथापालथ झाल्याचे पाहायला मिळत आहे. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी मोठी गरुडझेप घेत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा किताब पटकावला आहे. गौतम अदानी आता आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.
ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकात मोठा बदल झाला आहे. गौतम अदानी यांनी श्रीमंतांच्या यादीत मोठी झेप घेतली असून रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांना मागे टाकत नंबर 1 चे पद पटकावले आहे.
111 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह गौतम अदानी या यादीत 11 व्या क्रमांकावर आहेत. ते आशियातील आणि देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले आहेत. शुक्रवारी, अदानींची एकूण संपत्ती 5.45 अब्ज डॉलरने वाढली असून यासह त्यांची एकूण संपत्ती 111 अब्ज डॉलर झाली आहे.
शुक्रवारी अदानी समूहाच्या शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे गौतम अदानी यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, गौतम अदानी यांच्या एकूण संपत्तीत 5.45 अब्ज डॉलर्स म्हणजेच तब्बल 45 हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
किती आहे मुकेश अंबानींची संपत्ती?
दुसरीकडे मुकेश अंबानी या यादीत 12 व्या स्थानावर आणि 109 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह आशियातील श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत. शुक्रवारी त्यांची एकूण संपत्ती 26.8 अब्ज डॉलरने वाढली आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, गौतम अदानी हे जगातील 11 वे सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले आहेत. तर मुकेश अंबानी आता 12 व्या स्थानावर आले आहेत.
शुक्रवारी जगातील टॉप 12 अब्जाधीशांपैकी केवळ 3 अब्जाधीशांच्या संपत्तीत घट झाली आहे. ज्यामध्ये इलॉन मस्क, जेफ बेझोस आणि लॅरी ॲलिसन यांच्या नावांचा समावेश आहे. जेफ बोस यांच्या संपत्तीत सर्वाधिक घट झाली आहे. ॲमेझॉनचे संस्थापक बेझोस यांच्या संपत्तीत 2.75 अब्ज डॉलरची घट झाली आहे. आणि एकूण संपत्ती 199 अब्ज डॉलर्स झाली आहे.
इलॉन मस्क यांच्या संपत्तीत 493 दशलक्ष डॉलर्सची घट झाली आहे. सध्या इलॉन मस्कची संपत्ती 203 अब्ज डॉलर्स आहे. तर लॅरी एलिसनच्या संपत्तीत 21.7 दशलक्ष डॉलर्सची किंचित घट झाली आहे आणि त्यांची एकूण संपत्ती 132 अब्ज डॉलर इतकी झाली आहे.