टीम लोकमन मंगळवेढा |
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान आज आटोपले आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या बंडामुळे पक्षात पडलेली उभी फूट आणि यावेळी शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातच पवार कुटुंबातील दोन सदस्यांमध्ये लढत झाल्यामुळे आता या निवडणुकीचा काय निकाल लागतो, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. यादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपल्या राष्ट्रीय पक्षसंघटनेमध्ये काही नव्या नियुक्त्या करून सुप्रिया सुळे यांचेसह इतर नेत्यांकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
या नियुक्त्यांबाबत शरद पवार गटाने एक पत्रक प्रसिद्ध करून माहिती दिली आहे. त्यानुसार ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मान्यतेने सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी माजी खासदार पी.सी.चाको यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्ष संघटना आणि पक्षाची ध्येय-धोरणे अधिक बळकट करण्यासाठी दोन्ही नेतृत्वांचे सहकार्य निश्चित मिळेल असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला असून सुप्रिया सुळे आणि पी.सी. चाको यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अशी माहिती या पत्रकामधून देण्यात आली आहे. दरम्यान, गतवर्षी शरद पवार यांनी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना पक्षाच्या कार्याध्यक्षपदी नियुक्त केले होते. मात्र त्यानंतर काही दिवसांतच प्रफुल्ल पटेल हे अजित पवार यांच्या गटात सामील झाले होते.
त्याबरोबरच राजीव झा यांची ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार’ पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहितीही या पत्रकामधून देण्यात आली आहे.