टीम लोकमन मंगळवेढा |
मंगळवेढ्यातील संत दामाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. बी. पवार हे 31 मे रोजी सेवेतून निवृत्त झाले. आज त्यांचा महाविद्यालयाच्या वतीने सेवापूर्ती सन्मान सोहळा आयोजित केला असून त्यांच्या कारकीर्दीवर आधारित ‘कर्तव्यनिष्ठ सेवापूर्ती’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा देखील याच कार्यक्रमात संपन्न होणार आहे. आज रविवार दिनांक 2 जून रोजी सकाळी अकरा वाजता वीरशैव मंगल कार्यालय पंढरपूर रोड मंगळवेढा येथे हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती संत दामाजी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. औदुंबर जाधव यांनी दिली.
हा सेवापूर्ती सत्कार सोहळा लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार अभिमन्यू पवार यांचे शुभहस्ते व मंगळवेढा पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार समाधान आवताडे यांचे अध्यक्षतेखाली होणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. आबासाहेब देशमुख, रतनचंद शहा सहकारी बँकेचे चेअरमन राहुल शहा, स्वेरी कॉलेज पंढरपूरचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ. गोविंद काळे, सोलापूर येथील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. प्रमोद पवार हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या सेवापूर्ती सन्मान सोहळ्यासाठी शिक्षणप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संत दामाजी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. औदुंबर जाधव, उपप्राचार्य प्रा. राजेंद्र गायकवाड, शिक्षकेतर कर्मचारी नानासो लांडे, संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा प्रोफे. डॉ. एन. बी. पवार सेवापूर्ती सत्कार सोहळा समिती व महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व कर्मचारी आणि महाविद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थी यांचेवतीने करण्यात आले आहे.