टीम लोकमन मंगळवेढा |
लोकसभा निवडणुकीचे निकाल आले आणि अनेक पक्ष नेतृत्वांचा प्रभाव समोर आला आहे. त्यात भाजपला राज्यात दोन आकडी संख्याही गाठता आली नाही इतका दारून पराभव झाला आहे. तर काँग्रेस एका जागेवरून 13 जागांवर पोहचत राज्यात एक नंबरचा पक्ष ठरला आहे. त्यामुळे कॉंग्रेसचा आत्मविश्वास अधिकच वाढला आहे. त्यामुळे आता आगामी विधानसभेत काँग्रेस पक्ष 150 जागा लढवणार अशी थेट घोषणाच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केल्याने राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत.
एका वृत्तपत्राला मुलाखत देताना नाना पटोले यांनी आगामी विधानसभा निवडणुकीतील कॉंग्रेसचा प्लॅन सांगितला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, महाविकास आघाडी म्हणून लोकसभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेस आणि तीनही पक्षांनी अतिशय चांगली कामगिरी केली. मात्र सुरूवातीला जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यात साडे तीन महिन्यांचा वेळ गेला. त्यामुळे प्रचाराच्या कामांना म्हणावा तसा वेळ मिळाला नाही.
त्यामुळे आता विधानसभेत तसे करून चालणार नाही. हा विलंब टाळण्यासाठी आगामी विधानसभेसाठीचा जागावाटपाचा फॉर्म्युला येत्या महिनाभरात ठरवावा लागेल. त्यानंतर आतापासूनच विधानसभा निवडणुकीची तयारी करावी लागणार आहे. अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली. त्याचबरोबर यावेळी आगामी विधानसभेत काँग्रेस पक्ष 150 जागा लढवणार अशी थेट घोषणाच कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
दरम्यान लोकसभेतील यशानंतर जोरदार चर्चा आहे ती म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचीच. कारण 2019 ला फक्त एका जागेवर यश मिळालेले असताना नाना पटोलेंच्या नेतृत्वात महाराष्ट्रात काँग्रेसने चांगली मुसंडी मारली आहे. 1 जागेवरून थेट 13 जागांवर काँग्रेस पोहचली आहे. यामध्ये प्रामुख्याने लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे, एकटा चलो चालणार नाही हे लक्षात घेऊन बेरजेच्या राजकारणाला महत्व दिले. मात्र काँग्रेस पक्षाने आपल्या मूळ विचारधारेपासून कधीच फारकत घेतली नाही. त्याचा मोठा प्रभाव मतदारांवर दिसला आणि आज एका जागेवरचा पक्ष दोन आकडी संख्येवर जाऊन पोहचला आहे. त्यामुळे नाना पटोले यांच्या नेतृत्वावर एकप्रकारे शिक्कामोर्तबच झाले आहे.