टीम लोकमन मंगळवेढा |
केंद्रीय मंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील बैठक संपली असून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खलबतं होण्याची शक्यता आहे. आज देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची देखील भेट घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना दिल्लीत वेग आला आहे.
देवेंद्र फडणवीस आपल्या राजीनाम्यावर ठाम आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांनी काम सुरु ठेवण्याचा सल्ला दिला आहे. राजीनामा देऊ नका असेही अमित शहा यांनी सांगितले आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवर NDA च्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या निवासस्थानी हि बैठक होणार आहे. या बैठकीसाठी अमित शहा, राजनाथ सिंह पोहोचले आहेत. अजित पवार, प्रफुल पटेल, एकनाथ शिंदे, देखील बैठकीत सहभागी होणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपच्या खराब कामगिरीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या पदाचा राजीनामा देण्यावर ठाम आहेत. याबाबत काल रात्री त्यांनी ज्येष्ठ नेते अमित शहा यांची भेट घेतलीय.अमित शहा यांच्या घरी ही बैठक झाली होती. राजीनामा देऊन संघटनेत काम करायचे असल्याचे त्यांनी अमित शहा यांना सांगितले. त्यांच्या राजीनाम्याच्या प्रस्तावावर भाजप नेतृत्वाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.
महाराष्ट्रात भाजपची लोकसभा सदस्य संख्या २३ वरून नऊ झाली आहे. याच कारणामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाच्या कामावर लक्ष केंद्रित करता यावे, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती.
फडणवीसांचा राजीनामा पक्षश्रेष्ठींनी मान्य केला तर…
देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मान्य झाला तर महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री पदासाठी गिरीश महाजन यांच्या नावाची चर्चा आहे. अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चेसाठी गिरीश महाजन हेच कायम पुढे असतात. भाजपचे संकटमोचक म्हणून देखील त्यांच्या नावाची ओळख आहे. त्यामुळे केंद्रीय नेतृत्व त्यांच्यावर उपमुख्यमंत्री पदाची जबाबादारी देऊ शकते. याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती आली नाही. मात्र दिल्लीत वेगवान घडामोडी घडत असून महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच चर्चेत आले आहे.
उपमुख्यमंत्री पदासाठी या नावांची देखील चर्चा
चंद्रकांत पाटील
गिरीश महाजन
सुधीर मुनगंटीवार
आशिष शेलार
विनोद तावडे