टीम लोकमन मंगळवेढा |
नरेंद्र मोदींनी काल तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबतच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार देखील पार पडत असतानाच राज्याच्या राजकीय वर्तुळातून महत्तवाची बातमी समोर येत आहे. राज्यातील महायुती सरकारमधील रडखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच पार पडणार असल्याची माहिती आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वीच राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडेल अशी माहिती समोर येत आहे.
विधानसभा निवडणुकीआधी राज्य मंत्रिमंडळातील सर्व रिक्त पदे भरली जाणार असल्याची माहिती आहे. महामंडळाचे देखील वाटप करण्याची शक्यता आहे. या लोकसभा निवडणुकीत मोठा फटका महायुतीला सहन करावा लागला आहे. त्याच अनुषंगाने आगामी निवडणुकीआधी आमदारांना बळ देण्यासाठीचा हा महायुतीचा प्रयत्न असल्याच्या देखील चर्चा सुरू आहेत. त्यामुळे कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदे मिळणार? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
विधीमंडळाचे पावसाची अधिवेशन २७ जूनपासून सुरू होण्याची शक्यता आहे. या अधिवेशनापूर्वीच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी चर्चा आहे. राज्यासह देशात आत्ताच लोकसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.
कोणाला किती मंत्रीपदे मिळणार?
मंत्रिमंडळ विस्तारात महायुतीतील मित्रपक्षांना कोणाला किती मंत्रिपदे मिळणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र गेल्या मंत्रीमंडळ विस्तारापासून प्रतीक्षेत असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट आणि भरत गोगावले यांची मंत्रिपदी वर्णी लागणार, अशी सूत्रांची माहिती आहे. संदिपान भुमरे हे खासदार झाल्याने त्यांची एक जागा रिक्त झाली आहे. शिंदे गट आणि अजित पवार गटाला प्रत्येकी ३ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंत्री पदासाठी इच्छुक असलेल्या भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या पक्षातील आमदारांनी आत्तापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. या मंत्रिमंडळात विस्तारात महायुतीच्या कोणत्या आमदारांना मंत्रीपदाची संधी मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.