मंगळवेढा : अभिजीत बने
पावसाळा आणि पोटाच्या तक्रारी हे समीकरणच आहे. पावसाळी वातावरणात शरीरातील अग्नि मंद असतो. त्यामुळे हलकाफुलका आणि पचायला सोपा आहार घेणं जास्त चांगलं. पण आपण खरंच पावसाळ्यात हलका आहार घेतो का? याचा विचार करून बघा. खमंग कांदाभजी, बटाटेवडे किंवा चटकदार मिसळची डिश डोळ्यासमोर आलीच ना? पचनासाठी जड असलेले पदार्थ खाल्ल्यावर अग्नीवर ताण निर्माण होतो आणि पोटाच्या तक्रारींना सुरुवात होते. या तक्रारी उद्भवू नयेत यासाठी पचनक्रिया सुधारणारे पित्ताचे शमन करणारे आणि शरीराला आवश्यक पोषणतत्वही पुरवणारे काही पदार्थ सुचवीत आहोत.
डॉ. नयना सुरेश व्यवहारे
MD (AYU) PhD
शतायु आयुर्वेद रिसर्च सेंटर, सोलापूर
लाल भोपळ्याचं सूप
लाल भोपळ्याचे सालासकट मोठे तुकडे करून कुकर मध्ये दोन-तीन शिट्ट्या देऊन वाफवून घ्यावेत. शिजवताना त्यात आलं, काळे मिरे आणि दालचिनी घालावी. शिजवलेले मिश्रण मिक्सरमध्ये वाटावं आणि पुरेसं पाणी घालून उकळावं. चवीला मीठ घालावं आणि थोडीशी साय फेटून घालावी. गरम सूप पिताना त्यात थोडसं लोणी घातलं तरी छान लागतं. हे सूप सर्दी, खोकल्यासारख्या आजारांपासून दूर ठेवत. आजारी व्यक्तीला दिल्यास आजार लवकर बरा होण्यास मदत होते. शक्तीपातही दूर होतो.
आमसुलाचं (कोकमाचं) सार
पाच ते सहा आमसूलं दोन ग्लास (अर्धा लिटर) पाण्यात भिजवावी. एका पातेल्यात साजूक तुपाची जिरे घालून फोडणी करावी. त्यात आमसूलं व पाणी ओतावं. गूळ आणि चवीला मीठ घालावं. चार-पाच मिनिटे चांगलं उकळू द्यावं. हे सार भात, खिचडीबरोबर खाता येतं किंवा नुसतंही पिता येतं. पित्तनाशक असलेलं हे सार आम्लपित्त आणि गॅसेस कमी होण्यासाठी तसेच चांगली भूक लागण्यासाठी उपयुक्त ठरतं. मुख्य म्हणजे ते उपवासालाही चालतं.
आल्याचा चटका
आल्याचे बारीक बारीक तुकडे करावेत आणि तुपावर परतून घ्यावेत. क्ष्यात सैंधव, जिरेपूड, काळे मिरीची पूड थोडी शहाजिरे पूड घालावी. भाजून घेतलेलं चण्याचे पीठही थोडं घालावं. नंतर सर्व मिश्रणात पुन्हा तूप व हिंगाची फोडणी द्यावी. हे चटकदार चवीचे मिश्रण रोज अल्प प्रमाणात खाल्ल्यामुळे पचनशक्ती बलवान होते आणि घेतलेलं अन्न सहज पचतं. अपचनाने गॅसेस होत असल्यास त्याचं अनुलोमन होतं. तसेच तोंडाला रुची येऊन भूकही लागते.