टीम लोकमन मंगळवेढा |
गेल्या दोन वर्षांमध्ये मंगळवेढा पोलीस ठाण्यात उल्लेखनीय कामगिरी केलेले कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक रणजीत माने यांना पंढरपुर येथील आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून महत्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यातील दोन वर्षाच्या कार्यकाळात अनेक गुन्ह्यांचा तपास लावण्यात यश मिळवले. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले. पोलिस आणि नागरिकांमध्ये सुसंवाद ठेवण्याचा त्यांनी चांगला प्रयत्न केला. मंगळवेढा तालुक्यातील चोरीचे अनेक गुन्हे त्यांनी उघडकीस आणले. तालुक्यातील अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची त्यांचे सलोख्याचे संबंध होते. मंगळवेढा शहरातून होणारी जड वाहतूक रोखण्यासाठी त्यांनी विविध उपाय योजना केल्या. त्यामुळे शहरातून होणारी जड वाहतूक मोठ्या प्रमाणात कमी झाली.
पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मंगळवेढा पोलीस ठाण्यात त्यांनी अनेक उपक्रम राबविले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी दोन वेळा सर्व पोलीस कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी केली होती. मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहकार्याने त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात पोलीस कर्मचाऱ्यांचे इलेक्ट्रोकार्डिओग्राम (ईसीजी), रक्त तपासणी, शुगर तपासणी, रक्तदाब तपासणी या तपासण्या मोफत करण्यात आल्या होत्या.
त्यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात उल्लेखनीय व कर्तव्यनिष्ठ कारभार केला. दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्यांची पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर सुरक्षेसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर मंदिर सुरक्षेची महत्वपूर्ण जबाबदारी पोलीस विभागाकडून सोपविण्यात आली आहे. आषाढी वारीमध्ये मंदिराची सुरक्षा रणजीत माने यांच्यासाठी आव्हानात्मक जबाबदारी असणार आहे.