टीम लोकमन मंगळवेढा |
मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांची बदली पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर सुरक्षा विभागाकडे झाली असून मंगळवेढा पोलीस ठाण्याचा पदभार पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांचेकडे देण्यात आला आहे. महेश ढवाण पंढरपूर विठ्ठल मंदिर सुरक्षा विभागातून बदलीने मंगळवेढा पोलीस ठाण्यात नियुक्त झाले आहेत.
मूळचे कोल्हापूर येथील रहिवासी असलेल्या महेश ढवाण यांना पोलीस दलातील मोठा अनुभव असून त्यांनी ठाणे शहर, पुणे ग्रामीण, सोलापूर शहर आणि सोलापूर ग्रामीण पोलीस दलात विविध पदांवर काम केले आहे. नुकतेच बदलीने ते मंगळवेढा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झाले आहेत.
त्यांनी आजपर्यंत ठाणे शहर, खेड राजगुरुनगर पोलीस स्टेशन, देहू रोड पोलीस स्टेशन, सोलापूर शहरातील सदर बझार पोलीस स्टेशन, चाकण पोलीस स्टेशन, लोणी काळभोर पोलीस स्टेशन, भिगवन पोलीस स्टेशन, बारामती तालुका पोलीस ठाणे, रांजणगाव पोलीस स्टेशन, यानंतर पंढरपूर विठ्ठल मंदिर सुरक्षा विभागात केवळ दोन महिने सेवा केल्यानंतर त्यांची मंगळवेढा पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली असून त्यांनी नुकताच मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला आहे.
मंगळवेढा तालुका हा कर्नाटक सीमेलगत असून कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात अवैध प्रकारे गुटखा आणला जातो. यापूर्वी अनेकवेळा मंगळवेढा पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाने धाडी टाकून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला आहे. यावर नियंत्रण आणण्याचे देखील आव्हान नव्या पोलीस निरीक्षकांवर असणार आहे. वाढती गुन्हेगारी, अवैध व्यवसाय, अवैध प्रवासी वाहतूक, मंगळवेढा शहर व तालुक्यात वाढत असलेले चोऱ्यांचे प्रमाण रोखण्यासाठी काम करावे लागणार आहे.
मंगळवेढा शहरातून जाणाऱ्या जड वाहतुकीने अनेक निष्पाप नागरिकांचे आणि शालेय विद्यार्थ्यांचे बळी घेतले आहेत. मंगळवेढ्यातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळे तत्कालीन पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी शहरातून होणारी जड वाहतूक रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या. ही वाहतूक रोखण्यात त्यांना काही प्रमाणात यशही आले. परंतु अद्यापही शहरातून जड वाहतूक सुरू आहेच. शिवाय ऊस वाहतुकीचे ट्रॅक्टरही शहरामधून जातात. यावर निर्बंध घालण्यासाठीही ढवाण यांना काम करावे लागणार आहे.
मंगळवेढा पोलीस ठाण्याची वाहतूक शाखा ही फक्त कागदावरच कार्यरत असल्याचे दिसत आहे. वाहतूक शाखेचे पोलीस शहरातील वाहतूक नियंत्रण करताना कधीच दिसत नाहीत. शहराच्या बाहेर जाऊन बाहेर राज्यातून येणारी व इतर जिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांना अडवून त्यांना त्रास देण्यातच ते धन्यता मानत आहेत.
मंगळवेढा शहरातील दामाजी चौक, चोखामेळा चौक व बाजारपेठेत नेहमीच वाहनांची वर्दळ असते. अरुंद रस्त्यांमुळे व रस्त्यावरील वाहनांच्या पार्किंगमुळे अनेक वेळा ट्राफिक जामच्या समस्या उद्भवतात. परंतु ज्यांचेवर वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी आहे. ते वाहतूक पोलीस तेथे कधीच उपस्थित नसतात. त्यामुळे नेहमीच वाहतुकीची कोंडी झालेली पाहायला मिळते.
दामाजी चौकामध्ये सातत्याने वाहनांची वर्दळ असते. याच परिसरात मंगळवेढा बसस्थानक, इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ही तालुक्यातील मोठी शैक्षणिक संस्था आहे. तेथे हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळा भरताना आणि सुटल्यानंतर येथे नेहमीच वाहतुकीची कोंडी झालेली पाहायला मिळते. परंतु याठिकाणी देखील वाहतूक पोलीस उपलब्ध नसतात. शहरातील रस्त्यांवर बेशिस्त वाहने लावलेली असतात. त्यामुळे रस्त्यावरून ये जा करणाऱ्या वाहनधारकांना आणि पादचऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्याचे देखील मोठे आव्हान नव्या पोलीस निरीक्षकांसमोर असणार आहे.
काही महिन्यांपूर्वी प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी नवोमी साटम यांनी काही दिवसांसाठी मंगळवेढा पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला होता. त्यावेळी त्यांनी शहरातील बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्याचा अतिशय चांगला प्रयत्न केला होता. त्यांनी मोठ्या प्रमाणात कारवाईचा बडगा उगारल्याने वाहनचालकांना शिस्त लागली होती. वाहन चालकांमध्ये त्यांची मोठी दहशत होती. परंतु त्यांच्या बदलीनंतर पुन्हा परिस्थिती पूर्वपदावर आली आहे.