टीम लोकमन मंगळवेढा |
काँग्रेस पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक येत्या 19 जुलै रोजी होणार असून त्यामध्ये फुटलेल्या आमदारांवर मोठी कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
जागा वाटपा संदर्भातील ही बैठक असली तरी विधानपरिषद निवडणुकीत फुटलेल्या आमदारांवर कारवाई करण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची 8 मते फुटल्याचे दिसून आले होते.
काँग्रेसच्या कार्यकारिणीची 19 जुलैला महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला राज्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार असून दिल्लीतून केसी वेणुगोपाल आणि राज्याचे प्रभारी रमेश चन्नीथला उपस्थित राहणार आहेत.
विधानपरिषदेत निवडणुकीत ज्या आमदारांनी पक्षाच्या विरोधात जाऊन मतदान केले आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. या मागणीनंतर फुटीर आमदारांवर तात्काळ कारवाई होण्याचीही दाट शक्यता आहे.
कार्यकारणीची बैठक झाल्यानंतर पुन्हा एकदा काही निवडक नेत्यांची बैठक होणार असून या बैठकीत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची स्ट्रॅटेजी ठरवली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची 8 मते फुटल्याचे दिसून आले. या 8 आमदारांपैकी काही आमदारांनी भाजपला तर काहींनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदान केल्याचेही स्पष्ट झाले आहे.
आता पक्षातला कचरा साफ होईल?
फुटलेल्या आमदारांवर बोलताना विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीने दाखवून दिले, महाराष्ट्रातील जनता आमच्या बरोबर आहे. पण जनतेने निवडून दिलेल्या काही आमदारांनी पक्षाशी बेइमानी केली आहे. पक्षातील बेईमान आम्हाला शोधून काढायचे होते. म्हणूनच काँग्रेसने विधानपरिषद निवडणूक लढवली होती. आता पक्षातील कचरा साफ होईल. विधानपरिषद निकालानंतर घरचे भेदी शोधण्यात आम्हाला यश आले आहे. याबाबत पक्षश्रेष्ठींना संपूर्ण अहवाल देण्यात आला आहे. जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होईल. आमदार कैलास गोरंट्याल यांनी क्रॉस वोटिंग केल्याच्या बातम्या येत आहेत. पण हे वृत्त पूर्ण चुकीचे आहे. आमदार कैलास गोरंट्याल हे पक्षनिष्ठ आहेत. त्यांच्याबाबतचे वृत्त खोडसाळपणाचे आहे.
विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे 9 उमेदवार विजयी
विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली असून महायुतीचे सर्व 9 उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये भाजपचे 5, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या 2 उमेदवारांनी विजय प्राप्त केला. मात्र या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळाले. कारण काँग्रेसची 8 मते फुटली. शिवाय ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना महायुतीतील पक्षांची मते फोडण्यात अपयश आल्याचे या निवडणुकीत दिसून आले.