टीम लोकमन मंगळवेढा |
धाराशिव लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर यांनी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अर्चना पाटील यांना पराभवाची धूळ चारली आहे. तीन लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने ओमराजे निंबाळकर धाराशिव लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत.
विजयानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न अर्चना पाटील यांनी केला होता. पण त्यांची ही राजकीय खेळी अयशस्वी झाली असल्याचे बोलले जात आहे.
अर्चना पाटील यांनी त्यांच्याविरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती. पण ओमराजे यांना याप्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे. ओमराजे यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा नोंद होणार नाही. असा आदेश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिला आहे.
ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि त्यांचे सहकारी आमदार कैलास पाटील यांनी अंगरक्षकासह मतमोजणी केंद्रात मुक्त संचार केल्याचा अहवाल आल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी काढले होते. या आदेशात आता दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा नोंद होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी त्यांचे उमेदवार प्रतिनिधी रेवनसिध्द लामतुरे यांच्या माध्यमातून जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्याकडे आचारसंहिता भंगाची तक्रार केली होती.
पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी याप्रकरणी चौकशी करून अहवाल सादर केला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. या तक्रारीनंतर ओमराजेंच्या अडचणीत वाढ होण्याचे चित्र निर्माण झाले होते. लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर अर्चना पाटलांनी ओमराजे यांच्याविरोधात ही खेळी खेळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत होती.