टीम लोकमन पुसेसावळी |
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने 2 वर्षात 36 हजार पेक्षा जास्त रुग्णांना एकूण 301 कोटी रुपयांची विक्रमी मदत दिली आहे.
या योजनेंतर्गत गरजू रुग्णांना गंभीर व महागड्या शस्त्रक्रियांसाठी थेट अर्थसहाय्य मिळत असल्याने आणि संबंधित रुग्णांचे प्राण वाचत असल्याने जास्तीत गरजू रुग्णांनी या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन मुख्यमंत्री वैद्यकीय वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. दोन वर्षापुर्वी मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी वैद्यकीय सहाय्यता कक्ष त्वरित सुरु करत या योजनेचे मूळ संकल्पक असलेल्या मंगेश चिवटे यांची कक्ष प्रमुखपदी निवड केली होती. पहिल्या दिवसापासूनच मंगेश चिवटे आणि त्यांच्या सर्व टीमने रुग्णसेवेत झोकून दिले आहे.
वैद्यकीय मदतीसाठी आवश्यक कागदपत्रे
• अर्ज (विहीत नमुन्यात)
• निदान व उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
(खाजगी रुग्णालय असल्यास सिव्हील सर्जन यांचेकडून प्रमाणित करणे आवश्यक आहे.)
• तहसिलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला (रु.१.६० लाख पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.)
• रुग्णाचे आधारकार्ड (महाराष्ट्र राज्याचे) लहान बाळासाठी (बाल रुग्णांसाठी) आईचे आधारकार्ड आवश्यक
• रुग्णाचे रेशनकार्ड (महाराष्ट्र राज्याचे)
• संबंधीत आजाराचे रिपोर्ट असणे आवश्यक आहे.
• अपघातग्रस्त रुग्णांसाठी एमएलसी रिपोर्ट आवश्यक आहे.
• प्रत्यारोपण रुग्णांसाठी झेडटीसीसी / शासकीय समितीची मान्यता आवश्यक आहे.
• रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असल्याची खात्री करावी.
• अर्थसहाय्याची मागणी ई मेल (ईमेल-aao.cmrf-mh@gov.in) व्दारे केल्यास अर्जासह सर्व कागदपत्रे पीडीएफ स्वरुपात (वाचनीय) पाठवून त्याच्या मुळ प्रती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कडे टपालाव्दारे तात्काळ पाठविण्यात यावेत.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीअंतर्गत समाविष्ट आजारांची नावे
• कॉकलियर इम्प्लांट (वय वर्ष २ ते ६)
• हृदय प्रत्यारोपण
• यकृत प्रत्यारोपण
• किडणी प्रत्यारोपण
• फुफ्फुस प्रत्यारोपण
• बोन मॅरो प्रत्यारोपण
• हिप रिप्लेसमेंट
• हाताचे प्रत्यारोपण
• कर्करोग शस्त्रक्रिया
• लहान बालकांचे शस्त्रक्रिया
• अपघात शस्त्रक्रिया
• हृदयरोग
• डायलिसिस
• मेंदूचे आजार
• कर्करोग (केमोथेरपी / रेडिएशन)
• अपघात
• गुडघ्याचे प्रत्यारोपण
• नवजात शिशुंचे आजार
• विद्युत अपघात रुग्ण
• बर्न रुग्ण
“मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरायम आरोग्याचा प्रकाश आणला असुन या योजनेमुळे अनेक रुग्णांना अक्षरशः जीवनदान मिळत असल्याने ही योजना आता महाराष्ट्र राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना ठरत आहे.”
ना. एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
“मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गंभीर किंवा दुर्धर आजारांवरील उपचारासाठी गरजू रुग्णांना दिल्या जाणाऱ्या मदतीची/अर्थसहाय्याची प्रक्रिया ही पूर्णतः निशुल्क आहे.सर्व गरजू रुग्णांनी व नातेवाईकांनी याची विशेष नोंद घ्यावी. अर्थसहाय्य देण्यासाठी कोणत्याही स्वरुपाची आर्थिक देवाणघेवाण होत नाही. अशाप्रकारच्या गैरवर्तणुकीच्या घटना घडल्यास रुग्णांनी अथवा नातेवाईकांनी तात्काळ मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीशी संपर्क साधावा.”
मंगेश चिवटे
कक्षप्रमुख, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी तथा विशेष कार्यकारी अधिकारी मुख्यमंत्री
“मला किडणी प्रत्यारोपणासाठी आठ लाखांचा खर्च अपेक्षित होता. हा खर्च माझ्या आवाक्याच्या बाहेर होता. परंतु मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून दोन लाख व प्रधानमंत्री वैद्यकीय सहाय्यता मधुन तीन लाख रुपयांची भरीव वैद्यकीय मदत मिळाल्याने माझी किडणी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली व मला जीवनदानच मिळाले.”
व्ही.पी.थोरात
लाभार्थी रुग्ण
आता करू शकता थेट मोबाईलवर अर्ज….
८६५०५६७५६७ या टोल फ्री क्रमांकावर काॅल करताच थेट मोबाईलवर वैद्यकीय मदत अर्ज उपलब्ध होत असुन यासाठी मंत्रालयात जाण्याची गरज नसुन ऑनलाईन व पोस्टाने अर्ज व सर्व कागदपत्रे पाठवुन मदत मिळत आहे.
कर्ण/मुकबधीर मुलांना नवसंजीवनी
“मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामधुन गेल्या २ वर्षातील ३५ हजार रुग्णांपैकी १ हजार लहान मुले (वयोगट २ते ६) जी जन्मतच कर्ण व मुकबधीर होती त्यांच्यावरती काॅकलियर इम्प्लांट शस्त्रक्रिया केल्याने या मुलांना बोलू व ऐकु येवु लागल्याने ही मुले शाळेत जाऊ लागली व समाजाच्या मुख्य प्रवाहात आली आहेत.”
……म्हणून बाळाचे नाव ठेवले ‘दुवा’
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून वेळेत अर्थसहाय्य मिळाल्याने कोल्हापुर जिल्हातील कागल तालुक्यातील फरहीन मकुबाई यांच्या नवजात मुलीस जीवनदान मिळाले. मुख्यमंत्र्याचीच दुवा मिळाली म्हणुन त्यांनी मुलीचे नाव ‘दुवा’ ठेवले. या मुलीचा पहिला वाढदिवसही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत साजरा झाला व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘दुवा’ हीस मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची ब्रॅण्ड ॲम्बेसिडर म्हणुन घोषीत केले.