टीम लोकमन मंगळवेढा |
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महाराष्ट्रात जोरदार मुसंडी मारली तर दुसरीकडे महायुतीची पिछेहाट झालेली पाहायला मिळाली. या निवडणुकीत महायुतीमधील अनेक दिग्गज नेत्यांना पराभव पत्करावा लागला.
त्यानंतर आता सर्वच राजकीय पक्ष जोमाने विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. विधानसभेपूर्वी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. त्यानंतर पिंपरी-चिंचवडच्या काही माजी नगरसेवकांनी देखील शरद पवार गटात प्रवेश केला आहे. नुकतेच राज्यातील सर्वात मोठा दूध प्रकल्प असलेल्या सोनाई परिवाराचे संचालक प्रवीण माने यांनी देखील तुतारी हाती घेतली आहे.
आता कोल्हापुरात मोठा राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत शरद पवार असल्याचे दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार भाजप नेते समरजित घाटगे यांना राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून पक्षप्रवेशाची ऑफर देण्यात आली आहे. समरजित घाटगे यांना दोनदा ऑफर देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अशी समरजित घाटगे यांची ओळख आहे. हसन मुश्रीफ यांच्या विरोधात घाटगे यांना शरद पवार गटाकडून ऑफर देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. परंतु समरजीत घाटगे यांनी अद्याप तरी ऑफर स्विकारली नाही. त्यामुळे येत्या काळात घाटगे तुतारी हाती घेणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात इनकमिंग सुरूच…
येत्या काळात राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात जोरदार इनकमिंग सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना बाबाजानी दुर्राणी यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश केला होता. त्यानंतर इंदापूरच्या प्रवीण माने यांनी देखील अजित पवारांची साथ सोडत शरद पवार गटात प्रवेश केला आणि आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून समरजीत घाटगे यांना पक्षप्रवेशाची ऑफर दिल्याची माहिती समोर येत आहे.