टीम लोकमन मंगळवेढा |
रत्नागिरी-नागपूर महामार्गावर सोलापूर जिल्ह्यातील शिंगोली व कामतीच्या दरम्यान सोलापूरकडे वेगाने जाताना कार व दुचाकी यांचा अपघात झाला असून दुचाकीवरील दोघांची स्थिती अत्यंत गंभीर आहे हे लक्षात येताच सोलापूरहून मंगळवेढाकडे जाणारे झेप सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत मेलगे यांनी वेळीच प्रसंगावधान राखत राष्ट्रीय महामार्ग हेल्पलाइन क्रमांक 1033 शी संपर्क साधत अपघातग्रस्तांना मदत मिळवून देत त्यांना तातडीने सोलापूर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. वेळीच योग्य उपचार मिळाल्याने त्या दोघांचे प्राण वाचले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मरवडे ता.मंगळवेढा येथील श्रीकांत मेलगे हे कामानिमित्त सोलापूर येथे गेले होते. सोलापूर येथून परतत असताना मंगळवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता नागपूर-रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गावर शिंगोली व कामतीच्या मध्यवर्ती ठिकाणी सोलापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्यांना मोठ्याने आवाज ऐकू आला. तो आवाज ऐकताच त्यांनी आपली गाडी बाजूला केली व गाडी थांबवून पाहिले असता पलीकडच्या बाजूला अपघात झाला असून रस्त्याच्या कडेला एक युवक जखमी अवस्थेत पडलेला दिसून आला.
ते व आजूबाजूचे काही लोक त्या दिशेला गेल्यानंतर त्यांच्या असे लक्षात आले की, सोलापूरकडे जाणाऱ्या कारने पाठीमागून दुचाकीस्वराला धडक दिली आहे व दुचाकीस्वार गंभीररीत्या जखमी झाला आहे. तर दुचाकी वरील मागील माणूस कारच्या धडकेने उडून जाऊन पुढे जाणाऱ्या पिकअपच्या आत मध्ये जाऊन पडला आहे. तर दुचाकीला धडक देणारी रस्त्याच्या बाजूला उलटी होऊन पडली आहे. या अपघातात दुचाकी वरील दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वेळीच उपचार केले तर त्यांचे प्राण वाचू शकतात.
हे ध्यानी घेऊन अपघातस्थळी पोहचलेल्या श्रीकांत मेलगे यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ताबडतोब राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाल्यास मदत पुरवणाऱ्या 1033 या हेल्पलाइन संपर्क साधला. तेथे संपर्क साधून त्यांनी पूर्ण अपघाताची माहिती दिली व परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगत त्यांना वेळीच मदत झाली तर त्यांचे प्राण वाचू शकतात. असे सांगत त्यांना मदत करण्याचे आवाहन केले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून 1033 या हेल्पलाइन वरील कर्मचाऱ्यांनी ताबडतोब इंचगाव येथून रुग्णवाहिका पाठवून देत असल्याचे सांगितले.
श्रीकांत मेलगे त्यानंतरही त्यांच्या वेळोवेळी संपर्कात होतेच. त्यादरम्यान त्यांनी दुचाकीस्वार हे कोणत्या गावचे आहेत हे पाहून जामगाव येथील अपघातग्रस्तांच्या कुटुंबांनाही या अपघातीची माहिती देण्यात आली. थोड्याच वेळात राष्ट्रीय महामार्गावरील अपघातातील प्रवाशांना मदत करणारी रुग्णवाहिका आली व अपघातग्रस्तांना सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
अपघातानंतरचा एक तास हा गोल्डन अवर म्हणून ओळखला जातो यावेळेस मदत झाल्यास जखमींचे प्राण वाचतच नाहीत तर ते बरेही होऊ शकतात असा डॉक्टरांचा दावा आहे. अपघात झाल्यानंतर रुग्ण जीवन आणि मृत्यू यांच्याशी झुंजत असतो यावेळी त्याला योग्य उपचार मिळणे आवश्यक असते. श्रीकांत मेलगे यांच्या प्रसंगावधानामुळे दोघाजणांचे प्राण वाचणार आहेत.
श्रीकांत मेलगे गेल्या पंचवीस वर्षापासून समाजसेवेचे व्रत हाती घेऊन पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. गेल्या सात वर्षापासून मंगळवेढा तालुक्यात सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या झेप सामाजिक संस्थेचे ते संस्थापक म्हणूनही सामाजिक भान जपण्याचे कामही ते करीत आहेत. रक्तदान हे जीवनदान आहे हे ध्यानी घेऊन त्यांनी केले आहे.
अनेक वर्षापासून रक्तदान चळवळीतही मोलाचा सहभाग नोंदवला आहे. विविध सामाजिक चळवळींमध्येही त्यांनी आपले योगदान दिले आहे. आता त्यांनी वेळीच मदत केल्याने दुचाकी स्वरांचे प्राण वाचणार आहेत त्यामुळे श्रीकांत मेलगे हे आता रियल हिरो ठरले असून समाजातील विविध स्तरातून कौतुक केले जात आहे.