टीम लोकमन मंगळवेढा |
भारतीय जनता पक्षातील ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील लवकरच राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इंदापूर मतदारसंघाची जागा विद्यमान आमदार दत्ता भरणे यांनाच मिळणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांना महायुतीकडून उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळेच हर्षवर्धन पाटील भाजपला सोडचिट्टी देऊन शरद पवार गटात जाण्याच्या तयारीत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विभाजन झाल्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये गेल्याने राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांमध्ये मोठी स्पर्धा असल्याचे दिसत आहे. विद्यमान आमदारालाच उमेदवारी देण्याचा नियम महायुतीने ठरवला असल्याने इतर पक्षांच्या नेत्यांनी वेगळा पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे.
कोल्हापूरच्या कागलचे विद्यमान आमदार हसन मुश्रीफ यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय व भाजपचे मोठे नेते समरजितसिंह घाटगे यांनी शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच हर्षवर्धन पाटील यांनीदेखील असाच निर्णय घेणार असल्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. हर्षवर्धन पाटलांनी असा निर्णय घेतल्यास भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात असून इंदापुरात अजित पवारांसाठी ही धोक्याची घंटा असल्याचे बोलले जात आहे.