टीम लोकमन मंगळवेढा |
सोलापूर जिल्ह्यातील वजनदार नेते, भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी आज मंगळवेढा येथे झालेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाला दांडी मारली. या कार्यक्रमातील फडणवीसांच्या अनुपस्थितीची संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्राचा राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. यामुळेच आता परिचारक शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असून लवकरच तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात परिचारक यांनी आपला दबदबा कायम ठेवला आहे. सोलापूर जिल्ह्यात दूध उत्पादक संघ, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी निगडित संस्थांवर परिचारकारांनी आजवर आपले वर्चस्व अबाधित ठेवले आहे. या संस्थांवर त्यांनी संचालक पदासह अध्यक्षपदाची धुरा देखील यशस्वीरित्या सांभाळली आहे. सहकारातील डॉक्टर म्हणून परिचारकांचा पूर्ण राज्याला परिचय आहे. श्रीपुर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखाना परिचारकांनी अत्यंत यशस्वीपणे चालवला आहे. पंढरपूर अर्बन बँकेच्या माध्यमातून आर्थिक क्षेत्रातही परिचारकांचे दमदार काम आहे.
मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी येथे असणाऱ्या यूटोपियन शुगर या खाजगी साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी मंगळवेढा तालुक्यातही आपली पाळेमुळे घट्ट केली आहेत. मंगळवेढा येथील संत दामाजी सहकारी साखर कारखान्यातही त्यांच्या विचाराची सत्ता आहे. त्यांचे समर्थक शिवानंद पाटील हे कारखान्याचे अध्यक्ष आहेत. मंगळवेढा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये त्यांची सत्ता आहे.
पंढरपूर तालुक्याप्रमाणेच मंगळवेढा तालुक्यातही त्यांचा एक मजबूत गट आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांच्या गटाची भूमिका निर्णायक ठरणार आहे. परिचारकांना डावलने, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे हे भारतीय जनता पार्टीला महागात पडू शकते. भाजपवर नाराज असलेल्या परिचारकांच्या बदलत्या राजकीय भूमिकेमुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीसह महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल मंगळवेढ्यात विविध विकास कामांचा प्रारंभ व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. भाजपचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार समाधान आवताडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमांच्या जाहिरातींमध्ये प्रशांत परिचारक यांचा फोटो देखील वापरण्यात आला होता. रणजीतसिंह मोहिते पाटील वगळता भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्यातील सर्वच आमदार, लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.
मात्र पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात झालेल्या या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र भाजपचे बिग बॉस देवेंद्र फडणवीस उपस्थित असताना प्रशांत परिचारकांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती. खुद्द फडणवीसांच्या कार्यक्रमाला परिचारकांनी दांडी मारल्याने परिचारकांनी राजकीय भूमिका बदलल्याचे संकेत मिळत होते. कार्यक्रमस्थळी याची जोरदार चर्चा होती.
मागील काही दिवसांपासून माजी आमदार प्रशांत परिचारक व पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार समाधान आवताडे यांच्यामध्ये मोठी राजकीय दरी निर्माण झाली आहे. त्यातूनच परिचारक यांनी या कार्यक्रमाला दांडी मारल्याची चर्चा होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून प्रशांत परिचारक हे भाजपामध्ये नाराज आहेत. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघातून भाजपाचे विद्यमान आमदार समाधान आवताडे यांना भाजपची उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित झाले असून काल मंगळवेढा येथे झालेल्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षरीत्या आवताडे यांची उमेदवारीच जाहीर केली आहे.
त्यामुळे परिचारक शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. येत्या दोन दिवसात कार्यकर्त्यांची बैठक घेऊन परिचारक आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती मिळत आहे. परिचारकांनी राजकीय भूमिका बदलल्यास येत्या विधानसभा निवडणुकीत रंगत निर्माण होणार आहे. परिचारकांशिवाय निवडणुकीला सामोरे जाताना भाजपची दमछाक होणार आहे. त्यामुळे परिचारक काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.