टीम लोकमन सांगोला |
राज्यात येत्या काही दिवसात येऊ घातलेली विधानसभा निवडणूक मोठी रंगतदार होणार असल्याचे चित्र दिसत असून आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने विविध राजकीय पक्षांनी तसेच विधानसभेला इच्छुक उमेदवारांनी मोठी तयारी केली आहे. सेलिब्रिटी आमदार अशी ओळख असणारे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील सुद्धा विधानसभा तयारीला लागले असून मुंबई आणि परिसरात कामानिमित्त स्थायिक झालेल्या हजारो मतदारांना भेटण्यासाठी त्यांनी मुंबईत आज एका मेळाव्याचे आयोजन केले आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना निसटता विजय मिळाला होता. त्यांच्या या विजयामध्ये माजी आमदार व अजितदादांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असलेल्या दीपकआबा साळुंखे पाटील यांचा सिंहाचा वाटा होता. परंतु दीपकआबांनी या वेळेला निवडणूक रिंगणात उतरायची जय्यत तयारी सुरु केल्याने शहाजीबापूंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आता शहाजी बापूंनी मतदार संघातील नोकरी व व्यवसायानिमित्त बाहेर गेलेल्या मतदारांना साद घालण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.
सांगोला तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. दुष्काळी परिस्थितीमुळे व रोजगाराच्या अभावामुळे येथील अनेक नागरिक जगण्यासाठी देशाच्या विविध भागात गेलेले आहेत. सोने गाळण्याचे काम करणारे काही मतदार पश्चिम बंगाल, गुजरात, केरळ अशा विविध राज्यात गेल्या अनेक वर्षापासून राहत आहेत. अशाच पद्धतीने मायानगरी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेल व रायगड अशा ठिकाणी दहा हजारहून अधिक सांगोलकर अनेक वर्षांपासून राहत आहेत. या मतदारांना साद घालून आपल्या मतदारसंघात मतदानासाठी आणण्याच्या हेतूने आज शहाजी बापू पाटील यांनी कळंबोली येथे या मतदारांचे गेट-टुगेदर व स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. काल शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला गेलेल्या बापूंनी आज दुसऱ्या दिवशी लगेच मुंबई परिसरातील सांगोलकरांना एकत्रित करण्याचे नियोजन केले आहे.
आजच माजी आमदार दीपक आबा साळुंखे यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे उदरनिर्वाहासाठी गेलेल्या सांगोल्यातील बांधवांचा स्नेहमेळावा व भोजनाचे आयोजन केले आहे. काही दिवसापूर्वी दीपक आबांनी कलकत्त्यात जाऊन तेथील सांगोल्यातील नागरिकांना एकत्रित केले होते. आता शहाजी बापू पाटील हे मुंबईत आज स्नेहमेळावा घेत असताना दीपक साळुंखे यांनीही पुण्यात आजच स्नेहमेळावा आयोजित केला आहे. सांगोल्याचे फिक्स आमदार अशी जाहिरात दीपकआबा साळुंखे यांच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. यामुळे राज्यात सेलिब्रिटी आमदार म्हणून ओळख निर्माण झालेल्या शहाजी बापूंच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. सांगोल्याचा गड राखण्यासाठी शहाजीबापू आता जोरदार तयारीला लागले असून या दोघांच्या वादावर शेकाप मात्र लक्ष ठेवून आहे.
सांगोल्यातील ही सर्व मंडळी पोटाची खळगी भरण्यासाठी जरी मुंबईकडे गेली असली तरी त्यांनी आपल्या मातृभूमीच्या मातीशी असलेली नाळ मात्र तुटू दिलेली नाही. याचाच फायदा घेत मुंबई परिसरातील जवळपास दहा ते बारा हजार मतदारांचा मेळावा शहाजीबापू यांनी कळंबोलीतील न्यू सुधागड विद्यालय येथे आयोजित केला आहे. या मेळाव्यासाठी बापूंचे समर्थक गेल्या काही दिवसापासून मुंबई परिसरात असणाऱ्या सांगोल्यातील मतदारांशी संपर्क ठेवून या मेळाव्याची जय्यत तयारी व नियोजन करीत आहेत. पूर्वीचा दुष्काळी सांगोला ही ओळख पुसण्याचा प्रयत्न शहाजीबापू करीत असून या काळात मोठ्या प्रमाणात सिंचनाची व रस्त्याची कामे बापूंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून केली आहेत. मुंबईत राहणाऱ्या मतदारांना सांगोल्यात झालेल्या विकासाची माहिती देऊन सांगोल्याला पुन्हा एकदा सोन्याचे करण्यासाठी आपल्या मागे उभे रहा असे आवाहनही शहाजीबापू करणार आहेत. आज सायंकाळी 6 वाजता कळंबोली येथे होणाऱ्या या मेळाव्याला नेमके किती मतदार येणार याकडे बापूंचे लक्ष असले तरी त्यांनी या मेळाव्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. त्याचवेळी इकडे अजितदादांचे निकटवर्तीय असलेले दीपकआबा सुद्धा पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील संगोल्याच्या नागरिकांना साद घालण्यासाठी धडपडत आहेत.
गेल्या निवडणुकीत दीपक आबांच्या मदतीने निसटता विजय मिळवून विधानसभेत पोहोचलेल्या शहाजी बापूंना यावेळी विकास कामांच्या जोरावर निवडून यायचे असून त्यांचा पारंपारिक विरोधक असणाऱ्या शेतकरी कामगार पक्षासोबत दोन हात करताना त्यांना एक एक मत देखील लाखमोलाचे आहे. सध्या शेतकरी कामगार पक्षात डॉ. बाबासाहेब देशमुख व डॉ. अनिकेत देशमुख हे दोन सख्खे बंधू विधानसभेच्या उमेदवारीसाठी झगडत असून याचाच फायदा घेण्याचा प्रयत्न शहाजीबापू करीत आहेत. मात्र शहाजी बापूंना गेल्या वेळी निवडून आणण्यात सिंहाचा वाटा असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे पाटील यांनीही आता विधानसभेची जोरदार तयारी सुरु केल्याने शहाजी बापूंनी देखील डाव टाकायला सुरुवात केली आहे. दीपक आबांची सांगोला तालुक्यात मोठी ताकद असून सध्या त्यांच्याकडून ठाकरे गटाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. सांगोल्यात महाविकास आघाडीचे तिकीट ठाकरे गटाला मिळाल्यास दीपक साळुंखे हेच येथील महाविकास आघाडीचे उमेदवार असणार आहेत. मात्र तिरंगी लढतीत पुन्हा विधानभवन गाठण्यासाठी शहाजी बापूंना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
महाविकास आघाडीत सांगोल्याची जागा शेतकरी कामगार पक्षाला देण्यासाठी शरद पवारांचा प्रयत्न असला तरी सोलापूर जिल्ह्यात ठाकरे गटाला सध्या केवळ बार्शीची एकमेव जागा निश्चित झाल्याचे दिसत आहे. अशावेळी उद्धव ठाकरे यांच्याकडून गेल्यावेळी सांगोल्याचा आमदार शिवसेनेचा असल्याने ही जागा आम्हालाच पाहिजे अशी ठाम भूमिका घेतली आहे. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत शेकापचे जयंत पाटील आणि उद्धव ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांच्यात लढत झाल्याने ठाकरेंची शिवसेना व शेकाप मध्ये फारसे सख्य असल्याचे दिसत नाही. अशावेळी महाविकास आघाडीतून सांगोल्याची जागा पदरात पाडून घेण्यासाठी शिवसेनेचा ठाकरे गट आक्रमक झाल्याचे चित्र आहे.
मोहोळच्या जागेवर दावा करणाऱ्या ठाकरेंना शरद पवारांनी विरोध करताना येथील आमदार गेल्यावेळी राष्ट्रवादीचा विजयी झाल्याने ही जागा शरद पवार गटांने घेतली आहे. हाच धागा पकडत उद्धव ठाकरे गटाने गेल्यावेळी सांगोल्याचा आमदार शिवसेनेचा असल्याने ही जागा शिवसेनेकडेच राहील अशी ठाम भूमिका घेतल्याने सध्या महाविकास आघाडीत सांगोल्याच्या जागेवरून धुसपुस सुरू झाली आहे. याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न शहाजीबापू करीत असून दीपक साळुंखे पाटील यांनी गेल्या निवडणुकीत आपल्याला मदत केली असली तरी यापूर्वीच्या प्रत्येक निवडणुकीत ते शेकापसोबतच राहिले होते अशी आठवण शहाजीबापू करून देत आहेत.
सध्या तरी तिरंगी लढत झाल्यास शहाजी बापूंना विजय मिळवण्यासाठी मतदारसंघातील जगण्यासाठी बाहेर गावी असलेल्या मतदारांना आपल्याकडे वळवणे हाच सर्वात उत्तम पर्याय असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच शहाजीबापू यांनी आज मुंबईत सांगोल्यातील मतदारांसाठी मेळाव्याचे आयोजन केले आहे. ‘सोन्याच्या सांगोल्याची सोनेरी माणसे’ असे संबोधत या स्नेहबंधन मेळाव्याचे गणित बापू घालत आहेत. तर दीपकआबा देखील शहाजी बापूंना अडचणीत आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. याचा कितपत फायदा बापू व आबा यांना होणार हे पुढील काळात निश्चित होणार असले तरी सांगोल्याच्या संभाव्य तिरंगी लढतीत संगोळ्याचा गड राखणे ही बापुंसाठी अग्नीपरिक्षाच असणार आहे.
‘काय झाडी.. काय डोंगर.. काय हाटील.. समद ओके मंदी हाय’ या डायलॉगने संपूर्ण देशभरात ओळख निर्माण झालेल्या शहाजी बापूंना यंदाची निवडणूक ओके नसणार आहे. दीपक आबांमुळे शहाजी बापूंना विधानसभेची वाट बिकट झाली असून यंदाचा विधानसभेचा पेपर बापूंना अवघड जाणार हे स्पष्ट दिसत आहे.