टीम लोकमन मंगळवेढा |
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचाराचा शुभारंभ माचणुर येथील सिद्धेश्वर मंदिरात नारळ फोडून करण्यात येणार आहे.
अनिल सावंत यांच्या प्रचाराचा शुभारंभ माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते व सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष बळीराम काका साठे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
माचनुर येथील सिद्धेश्वर मंदिरात मंगळवार दिनांक पाच नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता हा प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत होत असून महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांचे सोबत अनिल सावंत यांची मैत्रीपूर्ण लढत होत आहे. त्यांच्यासमोर विद्यमान आमदार व महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांचे प्रमुख आव्हान असणार आहे. तर राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिलीप धोत्रे हे सुद्धा याच मतदारसंघातून नशीब आजमावत आहेत.
अनिल सावंत महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे बडे नेते तानाजी सावंत यांचे पुतणे असून मंगळवेढा तालुक्यातील लवंगीच्या भैरवनाथ शुगरचे ते चेअरमन आहेत. कारखान्याच्या माध्यमातून त्यांचा तालुक्यातील शेतकऱ्यांशी जवळचा संपर्क आहे. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला असून खेळ पैठणीचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक घराघरातील महिलांशी त्यांनी नाते निर्माण केले आहे. मंगळवेढा तालुक्यात शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग आहे. सध्या राज्यातील राजकीय परिस्थितीमध्ये शरद पवारांची मोठी क्रेझ आहे. याचा फायदा अनिल सावंत यांना या निवडणुकीत होणार आहे.