टीम लोकमन मंगळवेढा |
सांगली जिल्ह्यातील मिरज येथील लॅन्ड ब्रोकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष आणि नुकतेच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेले सुधाकर खाडे यांची कुऱ्हाडीने घाव घालून निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
या घटनेने संपूर्ण सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. भाजप नेते सुधाकर खाडे यांचेवर प्राणघातक हल्ला झाला असून मिरजेतील सिनर्जी हॉस्पिटल येथे त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. जागेच्या वादातून हा हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे.
भाजप स्टार्टअप इंडियाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर खाडे यांचा कुऱ्हाडीने निर्घृण खून करण्यात आला. यानंतर संशयित आरोपी पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला. सुधाकर खाडे यांचा शेत जमिनीच्या कारणातून निर्घृणपणे खून करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. भाजप नेते सुधाकर खाडे यांनी पंढरपूर रस्त्यावरील पावणेचार एकर न्यायप्रविष्ठ असणारी जमीन विकसनासाठी घेतली होती. या जागेवर कुंपण मारण्यासाठी सुधाकर खाडे हे काही साथीदारांसमवेत संबंधित शेत जमिनीमध्ये गेले होते. यावेळी शेत जमिनीचे कब्जे धारक आणि सुधाकर खाडे यांच्यात जोरदार वादावादी झाली.
नेमकं घडलं काय?
कार्तिक चंदनवाले या संशयित आरोपीने कुऱ्हाडीने सुधाकर खाडे यांच्या मानेवर हल्ला केला. कुऱ्हाडीचा मानेवर वर्मी घाव बसल्याने भाजप स्टार्टअप इंडियाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर खाडे यांचा जागेवरच मृत्यू झाला. तसेच त्यांच्या साथीदारांवर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न संशयित आरोपीच्या साथीदारांनी केला.
खुनानंतर कार्तिक चंदनवाले हा संशयित आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान सुधाकर खाडे यांच्या खुनाच्या घटनेमुळे संपूर्ण सांगली जिल्हा हादरला आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मोठ्या नेत्याची हत्या झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.