मंगळवेढा : अभिजीत बने
गेली दहा वर्षे भारतीय जनता पार्टीत रमलेले आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘राष्ट्रवादी पुन्हा’ म्हणत ‘घरवापसी’ केलेले राज्याचे माजी उच्चशिक्षण मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात राज्याची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी त्यांची वर्णी लागली आहे. एकीकडे वडिलांना पक्षात मानाचे पान मिळाले असताना दुसरीकडे त्यांचे पुत्र अभिजीत ढोबळे यांनी मात्र पक्षाच्या विरोधात सूर आळवला आहे. त्यामुळे हा चर्चेचा विषय झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मोहोळ विधानसभा मतदारसंघात दिलेला उमेदवार मान्य नसल्याने अभिजीत ढोबळे विधानसभा निवडणुकीत मोहोळ मतदार संघात वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी गेल्या दहा वर्षांपासून भाजपसोबत कसाबसा चाललेला संसार मोडीत काढून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघातून त्यांचे पुत्र अभिजीत ढोबळे आणि कन्या कोमल साळुंखे- ढोबळे या दोघांनीही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती. मात्र पक्षाने राजू खरे यांना मोहोळ विधानसभेची उमेदवारी दिली. त्यामुळे अभिजीत ढोबळे पक्षावर नाराज असल्याचे समजते.
राज्याच्या राजकारणातील दलित चेहरा म्हणून ओळखले जाणारे आणि अनेक वर्षे शरद पवार यांचे निष्ठावंत शिलेदार म्हणून ओळख असणारे माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी ‘घरवापसी’ करताच त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदावर संधी देऊन शरद पवारांनी त्यांचे एकप्रकारे राजकीय पुनर्वसनच केले आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचेहस्ते त्यांना नुकतेच नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे. ढोबळे सरांनी यांनी 2014 नंतर शरद पवारांची साथ सोडत भाजपमध्ये मेरिटवर प्रवेश मिळविला होता. पक्षाने त्यांच्यावर प्रदेश प्रवक्ते पदाची जबाबदारी सोपवली होती. परंतु ते भाजपमध्ये फारसे एकरुप झाले नाहीत. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा वारसा आयुष्यभर सांगणारे ढोबळे सर संघाच्या कुशीत फारकाळ रमले नाहीत. ढोबळे मास्तरांना रेशीमबागेपेक्षा गोविंदबागच अधिक हिरवीगार वाटली आणि पुन्हा ते पक्षात परतले.
दुसरीकडे मोहोळ राखीव मतदार संघातून उमेदवारी डावलली गेल्यामुळे नाराज झालेले प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांचे पुत्र अभिजीत ढोबळे यांनी मात्र राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या विरोधात सूर आळवायला सुरुवात केली आहे. पक्षाचे उमेदवार राजू खरे यांच्या विषयी त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली असून खरे यांच्या अवतीभवती शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या मंडळींचाच वावर असतो. जे पक्षाचे सदस्य होते त्यांना उमेदवारी डावलण्यात आली आणि जे पक्षाचे सदस्य नव्हते त्यांनाच उमेदवारी देण्यात आल्याबद्दल अभिजीत ढोबळे यांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. राजू खरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आहेत. त्यांचा प्रचार करायचा की नाही. याबाबतचा निर्णय येत्या 14 नोव्हेंबर रोजी आपण कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेणार आहोत असेही अभिजीत ढोबळे यांनी सांगितले.
आज छोट्या ढोबळेंचा निर्णय होणार…
उमेदवारी नाकारल्याने पक्षावर नाराज असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजीत ढोबळे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारापासून अलिप्त असल्याचे चित्र दिसत आहे. मोहोळ मतदार संघात शरद पवारांनी दिलेला राजू खरे हा उमेदवार मान्य नसल्याने अभिजीत ढोबळे निवडणूक प्रचारातून चार हात लांबच आहेत. आज दुपारी चार वाजता मोहोळ तालुक्यातील कुरुल येथे साई सुमन मंगल कार्यालयात अभिजीत ढोबळे यांनी निर्धार मेळाव्याचे आयोजन केले आहे. या निर्धार मेळाव्यात अभिजीत ढोबळे मोहोळ मतदार संघासाठी आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहेत. या निर्धार मेळाव्यात अभिजीत ढोबळे पक्षनिष्ठा जपत आपल्या वडिलांना मानाचे पान दिलेल्या शरद पवारांच्या पक्षाचे उमेदवार राजू खरे यांना बळ देणार की आपल्या वडिलांना त्रास देऊन राजकीय वनवास भोगायला लावलेल्या अजित पवारांच्या उमेदवाराचा प्रचार करणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.