टीम लोकमन मंगळवेढा |
शिर्डीहुन नाशिकला महामार्ग बस स्थानकात शनिवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास आलेली ई बस MH 04 LQ 9462 प्लॅटफॉर्मवर चौकशी कक्षासमोर थांबली होती. काही वेळेने बस थेट स्थानकात शिरली. यावेळी आंध्रप्रदेश राज्यातील महिला प्रवासी भाविक बसखाली सापडून जागीच ठार झाली. अंजली थट्टीकोंडा – नागार्जुन (वय 23, रा. पटछवा, जि. प्रकाशम, आंध्रप्रदेश) असे मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.
शिर्डी ते नाशिक या मार्गांवर धावणारी ई बस सुरक्षितपणे महामार्ग बस स्थानकात पोहचली. चालक उमेश दत्तात्रय भाबड (वय 32, रा. वेहळगाव,नांदगाव) यांनी बस थांबवली. सर्व प्रवशी खाली उतरल्यानंतर चालक उमेश भाबड देखील लॉकसीट एंट्री करण्यासाठी खाली उतरले. एन्ट्री करून भाबड पुन्हा बसमध्ये चढले. यावेळी त्यांनी बस सुरू करताच मोठा आवाज झाला आणि बसने अचानकपणे उसळी घेत क्षणात लोखंडी बार तोडून थेट चौकशी कक्षाच्या भिंतीवर जाऊन धडकली. कक्षाजवळ ओट्यावरून पती मुपाल्ला नागर्जून (वय 30, रा. कोंडीकंडुर, जि. प्रकाशम) यांच्यासोबत चालत असलेल्या अंजली यांना बसची जोरदार धडक बसली. यावेळी मुपाल्ला हे थोडक्यात बचावले. त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे. तसेच चौकशी खिडकीसमोर माहिती घेण्यासाठी उभे असलेले गोरक्ष मछिंद्र गोसावी (वय 57, रा. पाथर्डीफाटा) हे देखील बसच्या धडकेत गंभीर जखमी होऊन ओट्यावर कोसळले.
चौकशी कक्षाची एक भिंत पूर्णतः कोसळली. या दुर्घटनेने बसस्थानकात एकच खळबळ माजली. बसस्थानकातील कर्मचारी, अन्य बसचे चालक, वाहक यांनी धाव घेत जखमी गोसावी यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. अंजली यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. शासकीय जिल्हा रुग्णालयात त्यांना रुग्णवाहिकेतून हलविण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. गोसावी त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती मिळत जवळ असलेल्या मुंबई नाका पोलिसांनी महामार्ग बसस्थानकात धाव घेऊन चालक भाबड यांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात घेऊन गेले.