टीम लोकमन मंगळवेढा |
राज्यात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे. मंत्री विजयकुमार गावित यांचे बंधू आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. पक्षाचा राजीनामा देताना ते म्हणाले आहेत की, आगामी विधानसभेत शहादा-तळोदा मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार आहे.
माहितीनुसार, ते विधानसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. परंतु भारतीय जनता पार्टी त्यांना तिकीट देणार नसल्याची खात्री झाल्यावर अखेर राजेंद्रकुमार गावित यांनी भारतीय जनता पार्टीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास राजेंद्रकुमार गावित इच्छूक आहेत. मात्र येथे भारतीय जनता पार्टीचे राजेश पाडवी हे विद्यमान आमदार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीतही भाजप पुन्हा त्यांनाच येथून तिकीट देऊ शकते.
दरम्यान, राजेंद्रकुमार गावित यावीत यांनी 2014 ची विधानसभा निवडणूक ही त्यावेळच्या एकसंघ राष्ट्रवादीकडून लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा तब्बल 11000 हजार मतांनी पराभव झाला होता. यानंतर त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत ते शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघातून इच्छूक होते. मात्र पक्षाने त्यांना तिकीट न देताना राजेश पाडवींना तिकीट दिले होते. या निवडणुकीत पाडवी यांनी विजय मिळवला.
शहाद्यात राजेंद्रकुमार गावित यांना मानणारा मोठा मतदार वर्ग आहे. गावित इतर पक्षात गेल्यास भारतीय जनता पार्टीला येथे मोठा फटका बसू शकतो. राजेंद्रकुमार गावित शरद पवार गटात प्रवेश करु शकतात अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे.