टीम लोकमन मंगळवेढा |
सन 2018-19 मध्ये मंगळवेढा तालुक्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळामुळे चारा छावण्या सुरु करण्यात आल्या होत्या. त्यावेळच्या छावणी चालकांचे कोट्यवधी रुपये बील शासनाकडे प्रलंबित आहे. ते लवकर मिळावे यासाठी चारा छावणी चालकांसमवेत पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी राज्याचे मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांची भेट घेऊन सदर छावणी चालकांची बिले लवकरात लवकर अदा करण्यात यावित अशी मागणी केली होती. त्या मागणीला प्रतिसाद देत मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी चारा छावणी बिले देण्याची सहमती दर्शवली असून लवकरच छावणी चालकांची बिले मिळणार असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली.
बिलाचा प्रश्न मार्गी लागला आहे हे समजताच मंगळवेढा तालुक्यातील छावणी चालकांनी मुंबई येथे आमदार आवताडे यांच्यासोबत मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचा सत्कार केला आणि बिलाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आभार व्यक्त केले. गेल्या तीन ते चार वर्षांपासून चारा छावणी बिले शासन दरबारी प्रलंबित असल्याने या छावणी चालकांची खूप मोठी अर्थिक कुचुंबना होत होती.
छावणी चालकांच्या या मागणीवर आमदार आवताडे यांनी यापूर्वीही वेळोवेळी पाठपुरावा व निवेदनाच्या माध्यमातून तसेच विधानसभा सभागृहाच्या माध्यमातून अधिवेशनामध्ये चारा छावणी चालकांची रखडलेली बिले मिळण्यासाठी प्रयत्न केले होते. तत्कालीन दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये तालुक्यातील पशुधन व पशुपालक यांचे हित डोळ्यासमोर ठेवून या छावणी चालकांनी खूप मोठी आर्थिक गुंतवणूक केली होती. त्यामुळे त्यांना बिले मिळण्यात असणाऱ्या त्रुटी लवकरात लवकर दूर करून बिले अदा करण्यात यावीत असे आमदार आवताडे यांनी मंत्री अनिल पाटील यांच्याकडे मागणी केली होती.
तालुक्यातील सर्व चारा छावण्या छावणीचालकांकडून व्यवस्थितपणे चालवण्यात आल्या होत्या. पण तालुक्यातील चारा छावणी चालकांचे अनुदान शासनाकडे आज ही प्रलंबितच आहे. यासंदर्भात चाराछावणी चालकांसमवेत आमदार आवताडे यांनी मंत्री महोदयांची भेट घेत चर्चाही केल्या होत्या. तात्काळ प्रलंबित अनुदान/बीले मंजूर करावीत याकरिता निवेदनेही दिली होती.
त्यानुसार बिलाचा प्रश्न मार्गी लागला असून छावणी चालकांची प्रलंबित बिले लवकरात लवकर त्यांच्याकडे अदा केली जातील असे आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर, माजी उपसभापती धनंजय पाटील, जगन्नाथ रेवे, दीपक सुडके, धनंजय पवार, रामेश्वर मासाळ, सचिन शिंदे आदी उपस्थित होते.