टीम लोकमन मंगळवेढा |
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वरवंड परिसरात दोन एसटी बसचा अपघात झाला. अपघातात महिलेसह दोघांचा जागीच मृत्यू झाला. एसटी बसमधील 40 ते 50 प्रवासी जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नामदेव बाबुराव आढाव (वय 78, रा. चिंचपूर, आष्टी, जि. बीड ), सुवर्णा संतोष होले (वय 38, रा. बिरोबावाडी, पाटस, ता. दौंड) अशी मृत्युुमुखी पडलेल्यांची नावे आहेत. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील वरवंड परिसरात सोमवारी सायंकाळी अपघात झाला.
राज्य परिवहन महामंडळाची बस पुण्याहून सोलापूरकडे निघाली होती. त्यावेळी एक दुचाकीस्वार अचानक आडवा आल्याने एसटी बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. बस दुभाजक तोडून समोरून येणाऱ्या तुळजापूर-पुणे एसटी बसवर आदळली. अपघातात दोन्ही बसमधील चालक आणि वाहक गंभीर जखमी झाले आहेत. बसमधील सुमारे 40 ते 50 प्रवासी जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत गु्न्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.