टीम लोकमन मंगळवेढा |
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर जवळ झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. आज सायंकाळच्या सुमारास इंदापूर तालुक्यातील डाळज २ येथे हा अपघात झाला आहे. गाडीचा टायर फुटल्याने हा अपघात झाला असून अपघातात गाडीच्या समोरील बाजूचा पूर्णतः चुराडा झाला आहे.
फिरोज कुरेशी, रफिक कुरेशी, इरफान पटेल, मेहबूब कुरेशी आणि फिरोज कुरेशी अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तर अमीर सय्यद हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर भिगवण येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातातील जखमी आणि मयत तेलंगणा राज्यातील असल्याची माहिती मिळत आहे.
याप्रकरणी मिळालेली माहिती अशी की, पुण्याहून सोलापूरच्या दिशेने कार निघाली होती. इंदापूर तालुक्याच्या हद्दीतील डाळज या ठिकाणाहून ही कार भरगाव वेगात जात असतानाच डाव्या बाजूचा टायर फुटला. त्यानंतर गाडी उलटली आणि साधारण पन्नास मीटर ही गाडी जमिनीला घासत पुढे गेली. चार ते पाच वेळेत पलटी झाल्यानंतर ही गाडी सिमेंटच्या खांबाला जाऊन धडकली. आणि त्यानंतर नाल्यात पडली. गाडीतील सहापैकी पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पुणे ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्तांना बाजूला काढून तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र यातील पाच जणांचा मृत्यू झाला होता. सर्व अपघातग्रस्त हे तेलंगणा राज्यातील नारायण खेड येथील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे.