सोलापूर : सुरज राऊत
सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांच्या सुचनेनुसार दक्षिण सोलापूर तालुक्यातील दिंडूर येथील मतदान केंद्रावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. विशेषतः या गावात अक्षता पडण्यापूर्वी सकाळी या स्वच्छता मोहिम सुरू असताना नव वर व वधू यांनी हातात झाडू घेतला आणि सर्व परिसर स्वच्छ केला. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने येथील ग्रामपंचायतीमध्ये पहिल्यांदाच ग्रामपंचायतीचे शिपाई रविंद्र हुल्ले व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये पाणी पुरवठा कर्मचारी गुडप्पा ऐदुडे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या ध्वजारोहण कार्यक्रमानंतर मतदान केंद्रांवर स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती. यावेळी माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सर्वांना शपथ देण्यात आली आणि त्यानंतर मतदान केंद्राच्या ठिकाणी गावातील नव वर- वधू धालींग शरणप्पा रेऊरे व लक्ष्मी अशोक हतगुंदे, रविंद्र शरणप्पा रेऊरे व लक्ष्मी सिद्धाराम भासलगाव यांनी स्वतः हातात झाडू घेऊन मतदान केंद्रावर स्वच्छता मोहिमेमध्ये उत्स्फुर्तपणे उत्साहाने सहभागी होऊन स्वच्छता करण्यामध्ये चांगली मदत केली.
यावेळी सरपंच गिता हुल्ले , उपसरपंच जयश्री घोडके ग्रामसेविका एस.ए.सरवळे,सदस्य आशाराणी मिरजे, आशा कुलकर्णी, बसम्मा तुपसाखरे, ललिता बिराजदार, धालिंग घोडके यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी, संगणक परिचालक, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक इंगले व जेठे, पोलिस पाटील, तलाठी आर.जे.पवार, प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे सर्व कर्मचारी, आशाताई, अंगणवाडी सेविका व मदतनीस आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मल्लिकार्जुन हुल्ले, रामचंद्र बिराजदार, प्रकाश वडगाव, रविंद्र हुल्ले, गुडप्पा ऐदुडे व बसवराज घोडके यांनी परिश्रम घेतले. यावेळी मतदान केंद्र, स्वच्छतागृह व मतदान केंद्राचा परिसर, मतदान केंद्रावर मतदानाची खोली, स्वच्छतागृह, मतदान केंद्राच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली. यावेळी मतदान केंद्रावर पुरेसे फर्निचर, टेबल, खुर्च्या उपलब्ध करून ठेवणे, पिण्याच्या पाण्याचे नळ जोडणी करणे, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या जवळील परिसर व साठवणची स्वच्छता, मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची सोय करणे, सद्य स्थितीत उन्हाची तीव्रता जास्त वाढत असल्याने मतदान केंद्राच्या परिसरात मंडपाची व्यवस्था करुन उन्हापासून संरक्षण करणे, मतदान केंद्रामध्ये पुरेसा प्रकाश व खेळती हवा याबाबत नियोजन करण्यात आले.तसेच मतदान केंद्रावर प्राथमिक आरोग्य केंद्र यांचेमार्फत प्राथमिक उपचाराची सोय उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करण्यात आले.
सदरची स्वच्छता मोहिम अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप कोहिणकर, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.