ब्रह्मपुरी : संजय कुलकर्णी
ब्रह्मपुरी ता. मंगळवेढा येथील शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांचा जन्मोत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ब्रह्मपुरी ग्रामपंचायत कार्यालयात मोठ्या उत्साहात हे रक्तदान शिबिर संपन्न झाले. या रक्तदान शिबिरात ८० रक्तदात्यांनी रक्तदान केले.
शंभूराजे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते साईकिरण भारत पाटील, आनंद तानाजी पाटील, औदुंबर उत्तम पाटील यांचेहस्ते धर्मवीर संभाजीराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. छत्रपती संभाजीराजांच्या प्रतिमा पूजनाचेवेळी पृथ्वीराज शिंदे यांनी गारद सादर केली. सलग दोन मिनिट आवेश पूर्ण प्रचंड चैतन्याने छत्रपतींच्या व धर्मवीरांचा गुणगौरव आणि प्रताप अत्यंत जोशाने सादर करत वातावरणात स्फूर्ती आणि कमालीचा जोश आणला होता.
रक्तदान ही एक मौल्यवान आणि जीवनरक्षक देणगी आहे. जी आपण इतरांना देऊ शकतो. आपलं योगदान जरी कमी दिसत असलं तरी जीव वाचवण्यात ती महत्त्वाची भूमिका बजावते. गर्भधारणेदरम्यान, अपघात, शस्त्रक्रिया आणि गुंतागुंत यासारख्या परिस्थितींमध्ये हे अतिशय मोलाची मदत करते. थॅलेसेमिया, ल्युकेमिया, सिकलसेल रोग, ऍप्लास्टिक ॲनिमिया, रक्तस्त्राव विकार आणि विशिष्ट प्रकारचे कर्करोग यासारख्या वैद्यकीय स्थितीमध्ये उपचारांसाठी रक्ताची खूप मोठी आवश्यकता असते.
तुम्ही दान केलेल्या रक्ताची देणगी एखाद्या गंभीर परिस्थितीत जीवनदायी ठरू शकते. नियमित रक्तदान केल्याने रक्तपेढ्यांमध्ये चांगला साठा उपलब्ध राहतो आणि आहे. अपघातातील रुग्ण व इतर रुग्णांच्या रक्ताच्या गरजा तात्काळ पूर्ण करतात. हे उदार कृत्य गंभीर परिस्थितीत व्यक्तींना आशा देते. रक्तदान करणाऱ्यांच्या आरोग्यालाही याचा फायदा होतो.
या रक्तदान शिबिरात ऐन उन्हाळ्याच्या दिवसात ८० जणांनी रक्तदान करून अनमोल कार्य केले आहे. यावेळी शंभुराजे प्रतिष्ठानचे विशाल पाटील, रामभाऊ पाटील, हेमंत निकम, आदित्य पाटील, अभिजीत पाटील, श्रीनाथ शेवले, अभय देशमुखे, सुरज गोसावी, साईराज गुजरे, अण्णा कोकरे, राहुल कोकरे, देवराज पाटील, औदुंबर बबन पाटील आदि सदस्य उपस्थित होते.
हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी रेवनील ब्लड बँकेचे कर्मचारी माळी व त्यांचे सहकारी, शंभुराजे प्रतिष्ठानचे सर्व सदस्य, ब्रह्मपुरी ग्रामस्थ व युवकांनी परिश्रम घेतले. राज्यात उष्णतेची लाट असताना कडक उष्म्याने लाही लाही होत असताना ऐन उन्हाळ्यात हे रक्तदान शिबिर आयोजित करून तब्बल ८० बॅगा रक्तदान केल्याबद्दल शंभूराजे प्रतिष्ठानचे सर्वत्र कौतुक होत आहे.