टीम लोकमन सोलापूर |
प्रणिती शिंदे यांच्यात काम करण्याची धमक असून नेहमीच सिद्धेश्वर परिवाराच्या पाठीशी असणाऱ्या प्रणिती शिंदे यांच्या विजयासाठी जोमाने प्रयत्न करा असे आवाहन श्री सिद्धेश्वर परिवाराचे नेते व सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक धर्मराज काडादी यांनी केले.
सोलापुरातील श्री सिद्धेश्वर परिवारातील लिंगायत समाजाच्या प्रमुखांची बैठक श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे सर्वेसर्वा धर्मराज काडादी यांनी आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते. काडादी पुढे म्हणाले, सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडल्यानंतर लगेचच प्रणिती शिंदे यांनी कारखाना स्थळावर येऊन पाहणी केली आणि सर्व कामगारांना धीर दिला. प्रणिती शिंदे यांच्या अंगात काम करण्याची धमक आहे. दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, उत्तर सोलापूर, मोहोळ अशा पाच तालुक्यांमध्ये सिद्धेश्वर कारखान्याचे सभासद मोठ्या संख्येने आहेत. मी स्वतः लक्ष घालून सर्व तालुक्यात फिरून सभासदांची एक बैठक कारखान्याच्या मंगल कार्यालयात आयोजित करणार आहे. त्या बैठकीत मी सभासदांना आवाहन करणार आहे की, ज्यांनी मला त्रास दिला. कारखान्याची चिमणी पाडून हजारो शेतकऱ्यांचे संसार उध्वस्त केले अशा भारतीय जनता पार्टीला चारी मुंड्या चीत करा आणि प्रणिती शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा. प्रणिती शिंदे यांनी चिमणीचा मुद्दा वेळोवेळी सभागृहात मांडून धारेवर धरले होते. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही यात्रेच्या वेळी रस्त्याबद्दल स्वतः मंत्रालयात येऊन मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन रस्त्याचा विषय मार्गी लावला होता.
यावेळी बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले, मी सुद्धा वीरशैव कक्कय्या समाजाचा आहे. काडादी यांनी धाडस करून उघड उघड मीटिंग घेऊन पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. प्रणितीताई जिद्दी आहेत. त्या धडाडीने काम करतात. काम करताना जात-पात बघत नाहीत. त्यांना साथ द्यावी असे आवाहनही शिंदे यांनी केले.
धर्मराज काडादी व सिद्धेश्वर परिवाराच्या पाठिंब्यामुळे प्रणिती शिंदे यांना मोठे बळ मिळाले असून यामुळे प्रणिती शिंदे यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. प्रणिती शिंदे यांच्या मताधिक्यात या निर्णयामुळे मोठी वाढ होणार असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे
या बैठकीचे प्रास्ताविक सुरेश हसापुरे यांनी केले. या बैठकीसाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, जागतिक लिंगायत महासभेचे कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे, अमर पाटील, केदार उंबरजे, अशोक पाटील, माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील, शिवयोगी शास्त्री हिरेमठ, सिद्धाराम चाकोते, रामदास फताटे, शंकर पाटील, अनिल सिंदगी, रमेश बावी, हरीश पाटील, पशुपती माशाळ, सकलेश बाभुळगावकर, बिपिन करजोळे, सिद्धेश्वर साखर कारखाना कामगार युनियनचे अध्यक्ष अशोक बिराजदार, राजशेखर म्हमाणे यांचेसह सिद्धेश्वर साखर कारखाना, सिद्धेश्वर देवस्थान, सिद्धेश्वर शिक्षण संस्था, सिद्धेश्वर बाजार समिती या संस्थांचे पदाधिकारी तसेच लिंगायत समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.