टीम लोकमन मंगळवेढा |
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही गेला तरी एकच नारा घुमतोय तो म्हणजे ‘रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी’ तरी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडी व मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार व आपल्या प्रत्येक संकटात पाठीशी उभ्या राहणाऱ्या अनिल सुभाष सावंत यांना तुतारी वाजवणारा माणूस या चित्रासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या, संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
मंगळवेढा येथे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत त्या बोलत होत्या. सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, अनिल भाऊ हा सावली म्हणून तुमच्याबरोबर उभा राहणार आहे. आपल्या बरोबर नेहमीच ही प्रेमाची सावली, विश्वासाची सावली, आधाराची सावली देण्यासाठी सोबत असावी म्हणून आज त्यांच्यासाठी मत मागण्यासाठी मी इथे आले आहे. अनिल भाऊंचे चिन्ह काय तर तुतारी वाजवणारा माणूस आणि सोलापूर आणि महाराष्ट्रामध्ये आज कुठेही गेला तर एकच नारा घुमतोय राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी. सोलापूरची व माझी ओढ जास्त आहे त्याचे कारण असे की पवार साहेबांचा जन्म जरी पुण्यात झाला असला तरी सोलापूरकरांनी त्यांना गुंजभर जास्तच प्रेम दिले आहे. हे मी अजिबात विसरणार नाही. सोलापूर जिल्ह्यातील जनतेचे आणि आमचे नाते हे प्रेमाचे नाही. महाराष्ट्रात नव्हे तर देशात सगळ्यात युवा मुख्यमंत्री म्हणून मान पवार साहेबांना मिळाला परंतु पवार साहेब हे मुख्यमंत्री होण्यापूर्वी अगोदर सोलापूरचे पालकमंत्री होते. त्यामुळे सोलापूरकरांशी आमचे नाते अधिक घट्ट आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अनिल सावंत यांचेबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, अनिल सावंत यांच्याबद्दल मला अभिमान आहे. कारण एक नवीन चेहरा, पारदर्शक कारभार असणारे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी आजपर्यंत अतिशय उत्तमपणे पारदर्शकपणे आणि अतिशय स्वच्छ असे काम त्यांनी केले अशा भाऊसाठी मी मत मागायला तुमच्यासमोर आली आहे.
तुम्ही मनातून किती अस्वस्थ आहात हे मी जाणते. परंतु अनिलभाऊ तुम्हाला सांगते सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं. मतदान यंत्रावर अनिल सावंत यांचा क्रमांक 5 आहे. त्यामुळे या व्यक्तीचं पंढरपूर आणि मंगळवेढा या तालुक्याचे नातं अधिक स्पष्ट होते. कारण या दोन्ही तालुक्याची नावात पाचच अक्षरे आहेत. हा निव्वळ योगायोग नाही तर तुमचे देवानेच या तालुक्यातील मतदारांशी डायरेक्ट कनेक्शन निर्माण केले आहे.
भाजप व महायुतीच्या कारभारावर सडाडून टीका केली. सुप्रिया सुळे यांनी जनतेशी संवाद साधत सरकारच्या धोरणांचा चांगलाच समाचार घेतला. आपला देश कुणाच्या मर्जीने चालत नाही तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधानामुळे चालतो. देशात जाती धर्माचं गलिच्छ राजकारण केले जात आहे. जनता महागाईने त्रस्त झाली आहे. तुम्ही महाराष्ट्राची लाडके लेकींना दीड हजार रुपये देता आणि म्हणता जर तुम्ही विरोधकांच्या सभेत दिसला तर तुमचे फोटो काढू व तुमचे दीड हजार रुपये बंद करु. हे आपले वागणे बरे नव्हे असे म्हणत माता भगिनींच्या बद्दल अपशब्द काढणाऱ्या नेतेमंडळीची चांगलेच वाभाडे काढले. महाराष्ट्रातील जनतेने लोकसभेला दणका दिला म्हणून यांना लाडकी बहीण आठवली. भविष्यात आमचे, अनिलभाऊ सावंत यांचे सरकार येणार आहे. सरकार आल्यानंतर आम्ही महिलांना सन्मान म्हणून 3000 रुपये देणार आहोत. शेतमालाला हमीभाव देत असताना महागाई आटोक्यात राहील यासाठी आम्ही प्रयत्न करु. विविध प्रश्न घेऊन तुम्हाला मंत्रालयात जावे लागणार नाहीत तर मंत्रीच आपल्या दारी योजना आणून आपल्या साऱ्या समस्या जाणून घेतील यासाठी आमचा प्रयत्न राहील.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी व मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार अनिल सुभाष सावंत यावेळी बोलताना म्हणाले की, शरदचंद्र पवार साहेबांच्या विचारावर चालणारा हा मतदारसंघ आहे. त्यांच्या आजवरच्या कामाला पोहोच देण्याची वेळ आली आहे. शरदचंद्र पवार यांच्या जीवावर अनेक जण निवडून आले. परंतु त्यांना दगा देणे, फसवणूक करणे ही कामे त्यांनी केली. विरोधी पक्षातील उमेदवाराकडून बोलताना त्यांनी विकास कामांचा डोंगर आपल्यासमोर उभा करणाऱ्या मंडळींनी मंगळवेढा पंढरपूर रस्ता प्रवास कसा आहे हे एकदा पहावे म्हणजे आपल्याकडून कशा पद्धतीने विकास केला हे कळून येईल. आपल्या मित्र पक्षातील उमेदवार बद्दल बोलताना ते म्हणाले आपले कार्य सिद्ध करायचे असते परंतु वेगवेगळे पक्ष बदलण्यातच यांना मोठा रस आहे. जे पवार साहेबांचे होऊ शकले नाहीत ते जनतेचे काय होणार असा टोला लगावला. ते पुढे म्हणाले की, गेली अनेक वर्ष आपल्या भागात सातत्याने तेच ते प्रश्न समोर येत आहेत. ते सारे प्रश्न माझ्याकडून निश्चितच सुटतील अशी ग्वाही मी आपणास देतो. माझ्यावर विश्वास ठेवा मी तुमच्यासोबत 24 तास राहीन. मंगळवेढा तालुक्यातील पाणी प्रश्न कायमचा मिटवणे, तालुक्यात शैक्षणिक संकुल उभा करणे, महिला व युवकांच्या हाताला काम देणे, महात्मा बसवेश्वर स्मारकाचा प्रश्न निकालात काढणे, ब वर्गात असलेल्या व संत भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंगळवेढ्याचा विकास करणे, एमआयडीसी तातडीने सुरू करणे या गोष्टीला माझे प्राधान्य असेल.
यावेळी व्यासपीठावर राज्याचे माजी उच्चशिक्षण मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.लक्ष्मणराव ढोबळे, शिवव्याख्याते श्रीमंत कोकाटे, रतनचंद शहा सहकारी बँकेचे चेअरमन राहुल शहा, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष वसंतनाना देशमुख, पंढरपूरची माजी नगराध्यक्ष वसंतराव भोसले, शिवसेना शहरप्रमुख दत्तात्रय भोसले, काँग्रेसचे नेते फिरोज मुलाणी, माजी उपनगराध्यक्ष मुजफ्फर काझी, माजी नगरसेवक चंद्रशेखर कोंडूभैरी, राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष संतोष रंधवे, प्राचार्य साहेबराव पवार, माजी उपसभापती दादासाहेब गरंडे, युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष राजाभाऊ चेळेकर, महिला नेत्या संगीता कट्टे, मरवडेचे माजी सरपंच दादासाहेब पवार, पैलवान दामोदर घुले यांच्यासह महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.