मंगळवेढा : अभिजीत बने
सोलापूर शहर व जिल्ह्यातील शेतकरी, दीव्यांग व सामाजिक विषयावर आक्रमक होत सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच अग्रेसर असलेली प्रहार संघटना सोलापूर व माढा लोकसभा निवडणुकीत अद्याप तरी शांत असल्याचे चित्र दिसत असल्याने कदाचित ही वादळापूर्वीची शांतता आहे का? असाही प्रश्न जाणकारांना पडत आहे. त्यामुळे प्रहारच्या भूमिकेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
राज्याच्या सत्तासंघर्षात एकनाथ शिंदे सरकारला पाठिंबा देणारे प्रहारचे प्रमुख आमदार बच्चू कडू त्यांनी लोकसभा निवडणुकी संदर्भात कार्यकर्त्यांना कोणताच आदेश न दिल्याने प्रहारचे पदाधिकारी व प्रहार जनशक्ती पक्ष प्रचारापासून दोन हात लांबच आहेत. यामुळे प्रहार का शांत आहे ? का ही वादळापूर्वीची शांतता तर नव्हे ना? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. प्रहार पक्षाचे सोलापूर जिल्हा व शहरातील पदाधिकारी नेहमीच आक्रमक होत अनेक प्रश्न मार्गी लावत असतात. त्यामुळे प्रहारसोबत अनेक जण जोडले गेलेले आहेत. मागील काही दिवसांपूर्वी दिव्यांगाचा मेळावा घेण्यात आला होता या वेळीं सुद्धा प्रहार पक्षाची मोठी ताकद या ठिकाणी पहावयास मिळाली. हजारोंच्या संख्येने लोक सदर कार्यक्रमाला उपस्थित होते.
सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघामध्ये प्रहार संघटनेचे पदाधिकारी यांनी कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. सामाजिक प्रश्नांबरोबर दिव्यांग, अन्यायग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जाणे, कर्जमाफी,जबरदस्तीने सुरू असलेली कर्जाची वसुली विरोधात भूमिका, निकृष्ट कामे, टोल बंदी, पाणीपुरवठा, रस्ते या मूलभूत सोयी- सुविधांबरोबरच महत्त्वाच्या प्रश्नावर आक्रमक पवित्रा घेत आंदोलन करून प्रश्न मार्गी लावण्यात प्रहारचे पदाधिकारी नेहमीच अग्रेसर असतात. मात्र त्यांचा आक्रमकपणा लोकसभा निवडणूक प्रचारात दिसत नसल्याने त्यांच्या भूमिकेबद्दल सवाल उपस्थित होत आहेत.
राज्याच्या सतेत सहभागी असलेले बच्चू कडू यावेळी त्यांच्या अमरावती लोकसभा मतदारसंघातच अडकून पडले आहेत. महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांचे विरोधात दंड थोपटत प्रहार पक्षाचा उमेदवार दिनेश बुंब यांना लोकसभेच्या आखाड्यात उतरवून आपली वेगळी भूमिका मांडली आहे. याशिवाय राज्यातील आपल्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी अद्याप कोणताच आदेश दिला नाही. यामुळे पदाधिकारीही शांत आहेत. ऐन निवडणूक टप्प्यात आल्यानंतर ‘प्रहार’ करण्याची भूमिका तर त्यांची नसावी ना? असा प्रश्न सध्या उपस्थित करण्यात येत आहे. प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा जिल्हा पातळीवर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांबरोबर चांगले संबंध आहेत. असे असूनही ते लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून वंचित असल्याने प्रहारचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत.
समाजातील प्रत्येक प्रश्नांवर प्रहार करणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी या लोकसभा निवडणुकीत कुठेच दिसत नाहीत. यामुळे त्यांच्याही हालचालीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. वेट अँड वॉचच्या भूमिकेत असलेले पदाधिकारी आणि त्यांचे कार्यकर्ते ऐनवेळी काय निर्णय घेणार हे अद्याप अस्पष्ट आहे.बाहेरुन शांत असणारी प्रहार संघटना मात्र आतून वेगळीच रणनिती तर आखत नाही ना? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. प्रहारच्या प्रभावाचा जय आणि पराजयावर परिणाम होऊ शकतो.
दक्षिण सोलापुरच्या मंद्रूप येथील शेतकऱ्यांचे आंदोलन, महापालिका परिवहन तसेच लक्ष्मी विष्णू मिल कामगाराचा विषय असेल प्रहार जनशक्ती पक्षाने नेहमीच आक्रमक भूमिका घेत हे सर्व विषय मार्गी लावले आहेत. तसेच मंद्रूप ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला धक्का देत सत्तेपासून दूर ठेवण्याचे काम ही प्रहार जनशक्ती पक्षाने केले आहे. त्यामुळे दक्षिण मध्ये तसेच सोलापूर शहर आणि जिल्ह्यात प्रहार जनशक्ती पक्षाची मोठी ताकद आहे. त्यामुळे या निवडणुकीत प्रहारची भूमिका निर्णायक ठरणार आहे एकूणच प्रहारच्या भूमिकेकडे सोलापूर आणि माढा दोन्ही लोकसभा मतदारसंघातील राजकीय जाणकारांचे लक्ष आहे.