टीम लोकमन मंगळवेढा |
लोकसभा निवडणुकीच्या निकालाने महायुतीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचेच महायुतीमधील नेत्यांच्या वक्तव्याने स्पष्ट झाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचा लोकसभा निवडणुकीत भाजपला काहीच फायदा झाला नसल्याचा सूर आळवण्यात येत आहे.
तर दुसरीकडे भाजपमधील नेत्यांच्या बेताल वक्तव्याचा अजित पवार गटाला फटका बसल्याचा पलटवार करण्यात आला आहे. त्यामुळे पराभवाचे खापर फोडण्यावरुन महायुतीत वादाची ठिणगी पडल्याचे चित्र दिसत आहे.
अजित पवार गटावर खापर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे इंग्रजी मुखपत्र द ऑर्गनायझरने पहिल्यांदा अजित पवार गटावर तोफ डागली. निकालानंतर लागलीच भाजपला आरसा दाखविण्यात आला. अजित पवार गटाला सोबत घेतल्यानेच महाराष्ट्रात भाजपला पराभवाचे तोंड पाहायला लागल्याचा आरोप करण्यात आला. भाजपने त्यांना सोबत घेऊन किंमत कमी केल्याचे म्हटले गेले. आता विधानसभेपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे डॅमेज कंट्रोलची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
राष्ट्रवादीकडून हल्लाबोल
महायुतीत आम्ही विकासाच्या मुद्यावर आणि जनतेची कामे करण्यासाठी गेलो. संघाच्या बैठकीत जी काही चर्चा झाली ती त्यांची अंतर्गत आहे. मात्र अजितदादांना सोबत घेतल्याने त्यांचे काहीच नुकसान झाले नाही. पण भाजपवरची जी काही नाराजी आहे त्याचाच फटका अजित पवारांना बसला हे म्हणणे योग्य असल्याचा भीमटोला रुपाली पाटील यांनी लगावला आहे.
संघाच्या मुखपत्रात कोणीतरी लेख लिहला. त्यानंतर सातत्याने अजित पवारांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न राज्यात सुरु झाला आहे. भाजपच्या एका बैठकीत सुद्धा काही नेत्यांनी भाजपच्या पराभवाचे खापर अजित पवारांवर फोडले आहे. जर अशाप्रकारे अजितदादांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असेल तर आम्हाला निश्चित वेगळा विचार करावा लागेल, असे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितले होते.
अखेर सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया आलीच….
या संपूर्ण वादावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महायुतीतील पक्षांबाबत बोलताना पक्षाध्यक्षांची परवानगी घ्यावी, अशी सक्त ताकीद अमोल मिटकरी यांना दिल्याचे तटकरे म्हणाले. राजकीय भाष्य करण्यापूर्वी मिटकरी यांनी परवानगी घेण्याची ताकीद त्यांना देण्यात आल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. काही मंडळी महायुतीत बेबनाव असल्याचा मुद्दामहून प्रचार करत असल्याचा आरोपही तटकरे यांनी केला.