टीम लोकमन मंगळवेढा |
एकीकडे महाराष्ट्रात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. तर दुसरीकडे एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे. 44 प्रवाशांनी भरलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसला अचानक आग लागली. या आगीत संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी आली आहे. शेगाववरुन अकोल्याला निघालेल्या शिवशाही बसमध्ये ही मोठी दुर्घटना घडली.
महामार्ग क्रमांक सहावर तुषार हॉटेलजवळ शिवशाही भीषणने पेट घेतला. या आगीत संपूर्ण बस जाळून खाक झाली. या बसमध्ये 44 प्रवासी होते. मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. चालक गाडी चालवत असताना अचानक जळल्याचा वास आला. त्याने बस रस्त्याच्या कडेला उभी केली. तातडीने सर्व प्रवाशांना बसमधून बाहेर काढले.
पाहता पाहता संपूर्ण बसमध्ये आग पसरली. आगीने काही क्षणात रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण सीट जळून खाक झाल्या. चालकाने रस्त्यावरून जाणाऱ्या टँकर मधील सिलेंडरच्या साहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. काही नागरिकांनीही मदत केली. आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली.
आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे दोन बंब लागले मात्र आगीवर नियंत्रण न मिळवता आल्याने संपूर्ण शिवशाही बस जळून खाक झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र बस जळून खाक झाल्याने राज्य परिवहन महामंडळाचे मोठे नुकसान झाले आहे. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.