टीम लोकमन मंगळवेढा |
राज्यात येत्या काही महिन्यात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने पहिलाच मोठा धक्का भाजपला छत्रपती संभाजीनगरमध्ये दिला आहे. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भाजपचे माजी उपमहापौर राजीव शिंदे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश झाला आहे. त्यांच्यासोबतच भारतीय जनता पार्टीच्या सहा माजी नगरसेवकांनी देखील आज ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
माजी उपमहापौर राजीव शिंदेंचा ठाकरे गटात प्रवेश
राजीव शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा शाल घालून स्वागत केले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आता राजीव शिंदें यांनी हाती भगवा घेतला आहे. राजू शिंदेंचा ठाकरे गटातील प्रवेश भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या संभाजीनगर दौऱ्यामुळे मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे गटाचा शिव संकल्प मेळावा पार पडत आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा आजचा छत्रपती संभाजीनगर दौरा
शिव संकल्प मेळाव्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उद्धव ठाकरेंचा आजचा छत्रपती संभाजीनगर यांचा दौरा महत्त्वाचा ठरला आहे. माजी उपमहापौर राजीव शिंदे यांच्यासह अनेकांनी आज ठाकरे गटात पक्षप्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीच ठाकरे गटात इन्कमिंग सुरू झाल्याचे पहायला मिळत आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगर मधील ठाकरेंच्या शिवसेनेत चैतन्य निर्माण झाले आहे.
ठाकरे गटाचा आज शिव संकल्प मेळावा
छत्रपती संभाजीनगरमध्ये विधानसभेपूर्वीच वारं फिरलं आहे. भाजपचा बडा नेता आज शिवबंधनात अडकला आहे. यावेळी बोलताना राजू शिंदे अगोदर शिवसेनेत आले असते, तर मी ३५ हजारांच्या लिडने निवडून आलो असतो असा विश्वास देखील ठाकरे गटाचे नेते आणि लोकसभेतील पराभूत उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला आहे. खैरेंनी देखील राजू शिंदेंचं ठाकरे गटात स्वागत केले आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत गद्दारांना पाडायचेच असल्याचा टोला विरोधकांना लगावला आहे.