टीम लोकमन मंगळवेढा |
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. यामुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पुण्यातील चिंचवड मतदारसंघाच्या भारतीय जनता पार्टीच्या विद्यमान आमदार अश्विनी जगताप या शरद पवार गटाच्या संपर्कात असून त्या लवकरच तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत अश्विनी जगताप या भाजपच्या कमळ चिन्हा ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु आहे. पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांकडून पुन्हा एकदा अश्विनी जगताप यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
अश्विनी जगताप यांना पुन्हा उमेदवारी न देता भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत भारतीय जनता पार्टी असल्याचीही चर्चा आहे. याची माहिती आमदार अश्विनी जगताप यांना मिळाल्यानेच त्यांनी आता शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढण्याची तयारी केल्याचे बोलले जात आहे. अश्विनी जगताप यासंदर्भात अधिकृत बोलण्यास तयार नाहीत. मात्र शंकर जगताप यांच्यासोबत असलेले त्यांचे मतभेद लपून राहिलेले नाहीत.
पुणे जिल्ह्यातील चिंचवड विधानसभा मतदारसंघ जगताप कुटुंबाचा बालेकिल्ला म्हणून संपूर्ण राज्याला परिचित आहे. विधानसभा मतदारसंघाचे 2008 मध्ये परिसीमन झाले, त्यात चिंचवड विधानसभा मतदारसंघात पहिली निवडणूक 2009 मध्ये झाली. चिंचवड विधानसभा मतदारसंघात लक्ष्मण जगताप पहिले आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 2014 व 2019 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या तिकीटावर लक्ष्मण जगताप विजयी झाले. लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी चिंचवडमधून पोटनिवडणूक जिंकली. आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण जगताप यांचे बंधू भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शंकर जगताप हे चिंचवडमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे.
अश्विनी जगताप यांचे पती लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड येथे पोटनिवडणूक झाली त्यावेळी भाजपने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली होती. तेव्हाच दिवंगत लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप उमेदवारीसाठी इच्छूक होते. मात्र तेव्हा सहानुभूतीची लाट अश्विनी यांच्याबाजुने होती. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याचा शब्द भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांना दिला होता अशी चर्चा आहे. हाच शब्द आता फडणवीस पाळणार असल्याची कुणकुण लागल्याने भाजप आमदार अश्विनी जगताप वेगळा मार्ग निवडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होत आहे.
पिंपरी चिंचवडमधील उमेदवारीबद्दल अश्विनी जगताप आणि शंकर जगताप हे दोघेही बोलण्यास तयार नाहीत. मात्र भाजप शहर कार्यकारिणीतील नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर अश्विनी जगताप यांनाच पुन्हा उमेदवारी मिळणार असल्याचे म्हटले आहे. अश्विनी जगताप शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे वृत्त त्यांनी फेटाळले आहे.
भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्या आणि विधान परिषदेच्या नवनिर्वाचीत आमदार पंकजा मुंडे यांनी दोन आठवड्यांपूर्वी पिंपरी चिंचवडचा दौरा केला होता. तेव्हाच जगताप कुटुंबातील वाद मिटल्याची चर्चा होती. दीर विरुद्ध भावजय अशी लढत चिंचवडमध्ये होणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले होते. शंकर जगताप यांना पिंपरी चिंचवड महापालिकेत महापौर पदाचा शब्द देण्यात आल्याची चर्चा आहे.