टीम लोकमन मंगळवेढा |
अजित पवार गटाचे १८ ते १९ आमदार आमच्या पक्ष प्रमुखांच्या संपर्कात आहेत तर आणखी १२ आमदार भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात आहेत. ते आमदार काय निर्णय घेतात हे आपल्याला लवकरच समजेल. आमच्या संपर्कातील १९ आमदारांपैकी कोणाला घ्यायचे हे आमचे नेतेच ठरवतील. मात्र अडचणीच्या काळात जे लोक निष्ठेने आमच्याबरोबर राहिले त्यांना पहिले तर जे सत्तेत गेले आहेत त्यांना दुसरे प्राधान्य मिळेल असे मतही आमदार रोहित पवार यांनी येथे व्यक्त केले.
लोकसभा निवडणुकीतील यशानंतर आमदार पवार यांनी आज बुधवारी कऱ्हाड (जि. सातारा) येथील ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या येथील समाधिस्थळी जाऊन अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राज्याचे माजी सहकार,मंत्री आमदार बाळासाहेब पाटील, सत्यजितसिंह पाटणकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने, जशराज पाटील, सौरभ पाटील, सागर पाटील आदी उपस्थित होते.
आमदार पवार म्हणाले, ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांचे विचार फोटो लावून मिळत नसतात. खऱ्या अर्थाने ते विचार जपण्याचे काम शरद पवार यांनी केले आहे. तत्व हे चव्हाण साहेबांशी महत्वाचे होते. तेच तत्व शरद पवार हे जपत आहेत. आम्हीही विचार आणि तत्व जपून काम करणार आहोत. फोटो लावून विचार मिळत नसतो. त्याला संघर्ष करावा लागतो. लोकसभा निवडणुकीत मिळालेले यश हे त्याच विचारांचे यश आहे.
साताऱ्यातील अपयशाबद्दल ते म्हणाले, पुरोगामी विचार घेऊन पुढे चाललो असल्यामुळे साताऱ्याचा उमेदवार निवडून येणारच या विचारात आम्ही सर्वजण होतो. जे काय घडले ते अनपेक्षित घडले आहे. यात बऱ्याच काही गोष्टी झाल्या असतील त्याचा बारीक अभ्यास करावा लागेल. खासदार उदयनराजे भोसले हे निवडून आले त्यांना व्यक्तिगत मी शुभेच्छा देतो, पण पक्ष म्हणून आम्हाला ते पटलेले नाही. ज्या भाजपने पुरोगामी विचार संपवण्याचे काम केले, ज्या पक्षाने नेहमीच महाराष्ट्राला पाण्यात बघून खाली खेचण्याचे काम केले आहे, त्यांचा विचार होणे हे या परिसराला पटलेले नाही.
मात्र केवळ १५ दिवसात आमदार शशिकांत शिंदे यांनी खूप ताकदीने मोठा लढा दिला. त्यांना सामान्य लोकांनी पाठिंबा दिला. भाजपच्या मोठ्या नेत्यांनी येथे पैशांची व वेगवेगळ्या गोष्टींची ताकद लावली होती. तेथे थोडक्यात पराजय झाला. त्यामुळे शशिकांत शिंदेचेही मी अभिनंदन करतो. भाजपच्या प्रतिगामी विचाराला बारामतीत नाकारले असून साताऱ्याची जनताही प्रतिगामी विचाराला पायाखाली घेवून तुडवेल अशी अपेक्षा होती. मात्र तसे काही झाले नाही. मात्र, मी साताऱ्याच्या मतदारांचे आभार व्यक्त करतो. निवडणुकीत राहिलेल्या त्रुटी दूर करुन, त्या सुधारुन विधानसभा निवडणुकीत सर्व उमेदवार आमदार होण्यासाठी आम्ही प्रयत्न करु.
ते पुढे म्हणाले, अजित पवार गटाचे १८ ते १९ आमदार आमच्या पक्षप्रमुखांच्या संपर्कात आहेत, तर १२ आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. ते आमदार काय करतील हे लवकरच समजेल. आमच्या संपर्कात असलेल्या १९ आमदारांपैकी कोणाला घ्यायचे हे आमचे नेते ठरवतील. मात्र, अडचणीच्या काळात जे लोक निष्ठेने आमच्याबरोबर राहिले त्यांना पहिले प्राधान्य आणि जे सत्तेत गेले आहेत त्यांना दुसरे प्राधान्य असेल. येत्या काळात विधानसभेला विदर्भ, मराठवाडा, खानदेश सारखी जबाबदारी माझ्यासारख्यावर टाकली तर मी निश्चित आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेन, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.