टीम लोकमन मंगळवेढा |
महाराष्ट्राच्या राजकारणात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात मोठ्या घडामोडी घडणार आहेत. असे असताना आता राष्ट्रीय पातळीवरून एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार आणि अजित पवार या दोन्हीही गटांना मोठा झटका देणारी ही बातमी आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या डॅशिंग युवा नेत्या तसेच लेडी जेम्स बॉन्ड म्हणून ख्याती असलेल्या सोनिया दुहान यांचा उद्या काँग्रेस पक्षात प्रवेश होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन्ही नेत्यांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी सोनिया दुहान यांनी शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीकादेखील केली होती. त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. यानंतर सोनिया दुहान या अजित पवार गटात प्रवेश करतील, अशी चर्चा होती. पण तसे काही घडले नाही. विशेष म्हणजे त्यांनी अजित पवार यांचीदेखील भेट घेतली होती. पण त्यांनी त्यांच्या पक्षात प्रवेश केला नव्हता. अखेर सोनिया दुहान यांचा उद्या काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश होणार आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेते दीपेंद्र हुड्डा यांच्या उपस्थितीत सोनिया दुहान या आज काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. आगामी हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सोनिया दुहान यांच्या काँग्रेस पक्षप्रवेशाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. सोनिया दुहान या हुशार आणि शक्तिशाली युवा नेत्या आहेत. सोनिया दुहान या हरियाणाच्या राष्ट्रवादी (शरद पवार गट) विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा होत्या. त्यांची ओळख राष्ट्रवादीतल्या लेडी जेम्स बॉन्ड म्हणून आहे. जेव्हा शिंदे गटाचे आमदार गुवाहाटीहून गोव्यात मुक्कामी आले, तेव्हा त्यांच्या संपर्कासाठी सोनिया दुहान आणि इतर 3 पदाधिकारी गोव्यातल्या हॉटेलमध्ये शिरले होते. पण त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला होता.
अजित पवारांच्या पहाटेच्या बंडावेळी नरहरी झिरवाळांसह राष्ट्रवादीच्या 4 आमदारांना दिल्लीजवळच्या गुरुग्रामधल्या एका हॉटेलमध्ये ठेवले होते. मीडिया रिपोर्टनुसार, त्या हॉटेलबाहेर पहाऱ्यासाठी भाजपचे जवळपास दीडशे कार्यकर्ते होते. त्या हॉटेलमध्ये धुडगूस घालून राष्ट्रवादीच्या 4 आमदारांना पुन्हा मुंबईत आणणाऱ्या सोनिया दुहानच होत्या.
सोनिया दुहान यांनी सुप्रिया सुळेंवर काय आरोप केले होते?
सोनिया दुहान यांनी काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती. सुप्रिया सुळे या आमच्या नेत्या बनू शकल्या नाहीत असे सोनिया दुहान म्हणाल्या होत्या. तर सुप्रिया सुळे यांच्या जवळचे लोक कटकारस्थान रचत असल्याचा आरोपही सोनिया दुहान यांनी केला होता. “मी आजपर्यंत पक्ष सोडलेला नाही. पण मी खूप लवकरच पक्ष सोडण्याचा निर्णय घेणार आहे. मी दुसरा कोणत्या पक्षात प्रवेश करणार नाही. तुम्हाला वाटेल की, मी उद्या अजित पवार गट, भाजप किंवा काँग्रेस पक्षात जाईन, तर तसे नाही. मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. मी सध्या कोणताच निर्णय घेणार नाही. मी सध्या एकनिष्ठतेने बसले आहे. सुप्रियाताईंच्या आजूबाजूला काही लोक असे आहेत जे पक्षाचे काम करणाऱ्या नेत्यांना संपवण्याचे, हटवण्याचे आणि मजबूर करण्याचे काम करत आहेत. पक्ष सोडावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत”, असा गंभीर आरोपही सोनिया दुहान यांनी केला होता.