टीम लोकमन मंगळवेढा |
जगप्रसिद्ध असलेल्या ताजमहालला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे. धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर ताज येथील पोलिसांना सतर्क करण्यात आले आहे.
या ईमेल नंतर सुरक्षा यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहे. आता ताजमहलच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. आग्रा पोलिस सध्या मेल कुठून आला याचा कसून तपास करीत आहेत.
एसीपी ताज सिक्योरिटी सईद अरीब अहमद यांनी माहिती देताना यासंदर्भात सांगितले की, पर्यटन विभागाला एक ईमेल आला होता. त्या आधारे ताजगंज पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजूनही तपास सुरु आहे. ईमेलनुसार अद्याप असे कोणतेही इनपुट मिळालेले नाही. मात्र ताजमहलची सुरक्षा लक्षात घेऊन बॉम्ब निकामी पथक, शोध श्वान आणि इतर पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत.
उत्तर प्रदेश पर्यटन विभागाच्या उपसंचालक दीप्ती वत्स यांनी सांगितले की, संशयास्पद ईमेल आग्रा पोलिसांना पाठवण्यात आला आहे. त्या आधारावर एफआयआर देखील नोंदवण्यात आला आहे. तसेच आता ताजमहालला अशा धमक्या येण्याची ही पहिलीच वेळ नाही. फसव्या धमक्या देणारे काही घटक असे प्रकार करत राहतात. आता ही धमकी कोणी पाठवली याचा तपास सुरु आहे. असेही दीप्ती वत्स यांनी सांगितले.