टीम लोकमन मंगळवेढा |
बीड लोकसभा मतदारसंघात झालेल्या मतदान प्रक्रियेसंदर्भात शंका उपस्थित केल्या जात आहेत. बीड लोकसभा मतदारसंघातील परळी, केज आणि धारुर तालुक्यात बोगस मतदान केल्याचा आरोप बीड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी केला आहे.
बजरंग सोनवणे यांनी तशी तक्रारदेखील निवडणूक आयोगाकडे केली आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही याप्रकरणी सोशल मीडियात व्हिडीओ शेअर करत आवाज उठवला आहे. आता खुद्द शरद पवार यांनी या प्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
शरद पवार म्हणाले, बीडमध्ये बूथ कॅप्चर करण्याचे प्रकार घडले आहेत. ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. या प्रकरणी चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची गरज आहे. असे प्रकार घडत असतील तर काळ सोकावू शकतो. लोकांना मतदान न करु देण्याचे गंभीर प्रकार बीडमध्ये घडलेले आहेत. तसेच प्रकार बारामती येथेही घडले आहेत, असं म्हणत कठोर कारवाई करण्याची मागणी पवारांनी केली आहे.
बीड जिल्ह्यात विशेषतः परळी भागात मतदान कक्षातून मतदारांना बाहेर काढून आपल्याला हवे तसे मतदान भाजपने गुंडांकडून करून घेतल्याची माहिती समोर येत आहे. म्हणजेच पवित्र देवस्थान असलेल्या परळीत आता यापुढे लोकशाही नव्हे तर गुंडाराज चालणार का? हे असेच सुरू राहिले तर महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश व्हायला वेळ लागणार नाही. निवडणूक आयोग या गुंडगिरीला चाप लावणार आहे की केवळ बघ्याची भूमिका घेणार आहे? निवडणूक आयोगाने उत्तर द्यावे. अशी मागणी आमदार रोहित पवार करत आहेत.
बजरंग सोनवणे यांनी केली निवडणूक आयोगाकडे तक्रार
बीड लोकसभा मतदारसंघाचे शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी गेल्या आठवड्यात या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, परळी मतदार संघातील इंजेगांव, सारडगांव, धर्मापुरी, डिग्रस, नाथ्रा, कीडगांव, साबळा, जिरेवाडी, बालेवाडी व कन्हेरवाडी या गावातील मतदान केंद्रावर व मतदान केंद्र क्रमांक १८८, १८९, १३२ व १६१ आणि केज तालुक्यातील देवगाव, लाडेवडगाव, माजलगांवमधील गोविंदवाडी व धारुर मधील सोनिमोहा, पिंपरवडा, मंदवाडी व चाडगांव तर आष्टीमधील वाली आणि पाटोदा मधील वाघीरा हे सर्व मतदान केंद्र ताब्यात घेवून बोगस मतदान केलेले आहे.