टीम लोकमन मंगळवेढा |
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची मोठी धामधूम सुरु आहे. यंदा महाविकासआघाडी विरुद्ध महायुती अशी मोठ्या चुरशीची लढत निवडणुकीत होत आहे. सध्या राज्यात सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. तसेच प्रचाराचा धुराळाही मोठ्या प्रमाणात उडताना दिसत आहे.
सध्या विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. तर दुसरीकडे विविध राजकीय पक्षांमध्ये इनकमिंग व आऊटगोईंग सुरु झाले आहे. आता ऐन विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाने रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांना जोरदार धक्का दिला आहे.
रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. पांडुरंग शिंदे यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश केला. जळगावमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी पांडुरंग शिंदे यांनी रयत क्रांती संघटना सोडण्यामागचे कारणही स्पष्ट केले.
पांडुरंग शिंदे यांनी सांगितले सदाभाऊंना सोडण्यामागचे कारण…
सदाभाऊ खोत यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांवर टीका केली होती. पण मला ही टीका पटली नाही. त्यामुळे मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. असे पांडुरंग शिंदे यांनी सांगितले. सध्या सदाभाऊ खोत हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून लांब गेलेले आहेत. त्यांचे काम व्यक्ती केंद्रीत झाले आहे. अशी टीकाही पांडुरंग शिंदे यांनी केली.
सध्या सदाभाऊ खोत यांच्या विषयी पक्षातील अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. माझ्या संपर्कात जिल्ह्यातील 25 पदाधिकारी आहे. तेदेखील लवकरच शरद पवार गटात प्रवेश करतील असा दावा पांडुरंग शिंदे यांनी केला आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीतच रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्याने सदाभाऊ खोत यांना मोठा धक्का बसला आहे.