टीम लोकमन मंगळवेढा |
भाजप नेते किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. या प्रकरणी संजय राऊत यांना 15 दिवसांची कैद सुनावण्यात आली असून त्यांना 25 हजारांचा दंडही आकारण्यात आला आहे.
शिवडी कोर्टाने दिला निकाल
संजय राऊत यांनी मेधा सोमय्या या मुलुंडमधील एका शौचालय घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केला होता. याविरोधात मेधा सोमय्या यांनी शिवडी कोर्टात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. याप्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊन न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. या निकालाची गुरुवारी सुनावणी झाली. न्यायालयाने संजय राऊत दोषी असल्याचा निकाल दिला आहे. न्यायालयाने संजय राऊत यांना 25 हजारांचा दंड आणि 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. संजय राऊत यांना रितसर न्यायालयासमोर हजर व्हावे लागेल, त्यानंतरच ते कारावासाची शिक्षा कमी करण्याबाबत विनंती करु शकतात.
कोर्टाच्या निकालानंतर मेधा सोमय्या म्हणाल्या, ‘माझ्या कुटुंबावर, माझ्या मुलावर कोणी आँच आणायचा प्रयत्न केला तरी एक सामान्य गृहिणी कशी लढेल, तशीच मी लढले. मला न्यायालयाने योग्य तो न्याय दिला आहे. मी समाजसेवा करते आणि शिक्षणही देते, या दोन्ही गोष्टींचा सन्मान न्यायालयाने केला असे मला वाटते. मी न्यायालयाच्या निकालावर समाधानी आहे. शिक्षा होणे महत्त्वाचे आहे. अशाप्रकारची बेताल वक्तव्ये करण्याला यामुळे चाप बसेल.’
काय आहे नेमके प्रकरण…
मेधा सोमय्या यांनी शौचालय घोटाळा केला आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर या आरोपाचे पुरावे द्यावेत असे आव्हान किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांना दिले होते. मात्र संजय राऊत यांनी कोणतेही पुरावे न दिल्याने मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर 100 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला होता. संजय राऊत यांना यापूर्वीच मानहानी, बदनामीची नोटीस दिली आहे. मुलुंड पोलिस स्टेशन येथे तक्रारही दाखल केली आहे. एक रुपयाचा घोटाळा झालेला नसताना, एक रुपयाचा घोटाळाचे पुरावे/ कागदपत्र नसताना संजय राऊत यांनी फक्त भीतीसाठी, बदनाम हा अपप्रचार केला आहे. असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.