टीम लोकमन नांदेड |
नांदेड लोकसभेचे खासदार वसंत चव्हाण यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर हैदराबाद येथील किम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मध्यरात्री त्यांची तब्येत अचनाक बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु अखेर पहाटे 4 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
काही दिवसांपूर्वी नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांची प्रकृती अचानक खालावली होती. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हैदराबाद येथील किम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. वसंत चव्हाण यांना श्वास घेण्यास अडचण होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
त्यांना लो बीपीचाही त्रास होत होता. मध्येच त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने कुटुंबीयांनी त्यांना सुरुवातील नांदेड येथील रुग्णालयात त्यांना दाखल केले. काही काळ तिथे उपचार घेतल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वसंत चव्हाण यांना हैदराबाद येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले होते. वसंत चव्हाण यांना उपचारासाठी एअर ॲम्ब्युलन्सने हैद्राबाद येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते.
दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांची कारकीर्द
वसंत चव्हाण खासदार होण्याआधी महाराष्ट्र विधानसभेवर अपक्ष म्हणून निवडून गेले होते. त्यांनी नायगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी 2014 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मे 2014 मध्ये त्यांची विधानसभेच्या लोकलेखा समितीवर नियुक्ती करण्यात आली होती. ते जनता हायस्कूल आणि ॲग्रीचे अध्यक्षही होते.
नांदेड जिल्ह्यात 2009 साली नायगाव विधानसभा मतदारसंघाची नव्याने निर्मिती झाल्यानंतर या मतदारसंघाचे पहिले आमदार वसंतराव चव्हाण राहिले आहेत. नांदेडमध्ये अशोक चव्हाण-भास्करराव खतगावकर या नेत्यांविना काँग्रेस जिंकू शकते हे त्यांनी मोठ्या आश्वासकतेने सिद्ध करत नांदेडमधील काँग्रेसचे वर्चस्व कायम राखले होते. वसंत चव्हाण 1978 साली आपल्या नायगाव या गावचे पहिल्यांदा सरपंच झाले. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेवरही काम केले. 2002 साली ते जिल्हा परिषदेवर निवडून आले होते, पण नंतर लगेचच त्यांना विधान परिषदेवर संधी मिळाली. तिथून पुढे तब्बल 16 वर्ष ते विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात कार्यरत होते. नायगाव या गावात एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मोठा शैक्षणिक विस्तार केला आहे.
2024 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडे विजय खेचून आणला
काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये अशोक चव्हांनी काँग्रेसला रामराम केला. आणि भाजपमध्ये प्रवेश केला. भारतीय जनता पार्टीने त्यांना राज्यसभेवर संधी दिली आणि त्यानंतर भाजपला नांदेड आणि हिंगोली लोकसभा जिंकण्याचा मार्ग मोकळा झाला. भाजपकडून प्रताप पाटील चिखलीकरांना पुन्हा संधी देण्यात आली तर काँग्रेसकडून वसंतराव चव्हाणांना संधी देण्यात आली.
अशोक चव्हाणांचा पाठिंब्यामुळे भाजप नांदेडची जागा सहज जिंकेल अशी चर्चा असतानाच मतदारांनी मात्र वेगळाच निर्णय घेतल्याचे दिसून आले. काँग्रेसच्या वसंतराव चव्हाणांनी भाजपच्या प्रताप चिखलीकरांचा मोठा पराभव केला. आणि अशोक चव्हाणांच्या जाण्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस संपली नसल्याचा संदेश या निवडणुकीच्या निमित्ताने दिला.