टीम लोकमन मंगळवेढा |
महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठी घडामोडी घडली असून ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. सयाजी शिंदे यांनी अनेक चित्रपट आणि नाटकांमध्ये दमदार भूमिका केल्या आहेत.
सयाजी शिंदे यांनी फक्त मराठीच नाही तर हिंदी, तेलगू, तमिळ चित्रपटांमध्येही मोठे काम केले आहे. सयाजी शिंदे हे त्यांच्या सामाजिक कार्यामुळे देखील प्रसिद्ध आहे. सयाजी शिंदे यांनी पर्यावरणाचा समतोल रहावा यासाठी स्वत:हून पुढे येत लाखो झाडे लावली असून त्यांचे संवर्धनही केले आहे. त्यांनी निर्माण केलेल्या सह्याद्री देवराईचे सर्वत्र कौतुक झाले आहे. सयाजी शिंदे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेशामुळे पक्षाला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. सयाजी शिंदे यांच्या पक्षप्रवेशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी त्यांचे स्वागत केले.
सयाजी शिंदे यांच्या पक्षप्रवेशाची सुरुवातच केवळ राष्ट्रवादीवरच्या फोकसने सुरू झाली. सयाजी शिंदे खडतर परिस्थितून पुढे आलेले अभिनेते आहेत. त्यांनी चित्रपट सृष्टीत अद्वितीय स्थान निर्माण केले आहे. मराठी मनाला अभिमान वाटावा असे त्यांचे कार्य आहे. त्यांनी आपल्याला केवळ अभिनयापुरतेच सीमित ठेवले नाही तर त्यांनी पर्यावरणाव क्षेत्रातही अतिशय उल्लेखनीय काम केले आहे असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे म्हणाले.
अभिनेते सयाजी शिंदे यांच्या राष्ट्रवादीतील पक्ष प्रवेशाच्या वेळी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस लतीफभाई तांबोळी यांचेसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
अभिनेते सयाजी शिंदे यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश म्हणजे अजितदादांच्या कामाची पावती : ज्येष्ठ नेते छगन भुजबळ
उद्या दसरा आहे. परंतु आजच आम्हाला दसऱ्याचा उत्सव साजरा करण्याचे भाग्य लाभले आहे. नाव जरी मराठी असले तरी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ते अभिनेते आहेतच. पण आता ते नेते होणार आहेत. कारण सामाजिक कामातही त्यांनी तेवढेच मोठे काम केले आहे. दक्षिण भारतातही काम केले आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन तर केलेच पण लोकांच्या दु:खाला हात घालून ते दु:ख कमी करण्याचे महान काम देखील त्यांनी केले आहे. ते नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आहेत. त्यांची वेगळी ओळख करुन देण्याची गरज नाही असेही भुजबळ म्हणाले.
तुमचा चेहरा मराठी माणसाला नाटक, सिनेमा, टीव्हीच्या माध्यमातून माहीत आहे. एखाद्याला नेता करताना कष्ट लागतात. पण तुम्हाला नेता करण्यासाठी कष्ट घ्यावे लागणार नाही. सयाजी शिंदे यांच्यासारखी मंडळी अनुभवी आहेत. राजकारणातील घडामोडी त्यांना माहीत आहेत. ते आमच्याकडे साथ देण्यासाठी आले आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे. सयाजी शिंदे यांचा प्रवेश म्हणजे अजितदादांच्या कामाला मिळालेली पावती आहे. आम्ही तुमचा पूर्ण मानसन्मान राखू असेही छगन भुजबळ म्हणाले.