टीम लोकमन मंगळवेढा |
सांगली जिल्ह्यात झालेल्या भीषण रस्ते अपघातात 3 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुचाकी आणि प्रवासी जीपची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला आहे. मिरज तालुक्यातील कवलापूर गावानजीक हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातील कवलापूरजवळ दुपारच्या सुमारास हा अपघात झालाय. भरधाव प्रवासी जीपने दुचाकीवरुन जाणाऱ्या कुटुंबाला धडक दिली. या अपघातामध्ये दिपाली विश्वास म्हारगुडे (28 वर्षे), सार्थक (7 वर्षे) आणि राजकुमार (5 वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला. तर विशाल दादासो म्हारगुडे (30 वर्षे) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातातील जखमी आणि मृत हे सर्वजण आटपाडी तालुक्यातील तळेवाडी येथील रहिवासी आहेत.
विशाल म्हारगुडे हे मुळचे आटपाडीचे असून सांगली येथे राहतात. ते दुचाकीवर पत्नी आणि दोन मुलांना घेऊन लग्नकार्यासाठी जात होते. त्याचेवळी समोरुन येणाऱ्या भरधाव प्रवासी जीपने दुचाकीला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर घटनास्थळावर मोठी गर्दी झाली होती. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या विशाल म्हारगुडे यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यांची प्रकृती देखील खूपच गंभीर व चिंताजनक आहे. या अपघाताचा तपास सांगली पोलिसांकडून सुरु आहे.