टीम लोकमन मंगळवेढा |
पंढरपूर अर्बन को-ऑप बॅंक लि. पंढरपूर या बॅंकेच्या बारामतीतील शाखाधिकाऱ्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे या बॅंकेत सुमारे 9 कोटी 3 लाख 361 रुपयांचा अपहार केला आहे. अमित प्रदीप देशपांडे (रा. सहयोग सोसायटी समोर, गुरुसदन हौसिंग सोसायटी, बारामती) या शाखाधिकाऱ्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी बॅंकेच्या मुख्य शाखेकडून कृष्णकुमार पुरुषोत्तम पेंडाल (रा. कोर्टी रोड, परिचारकनगर, पंढरपूर, जि. सोलापूर) यांच्याकडून फिर्याद देण्यात आली आहे.
ते मुख्य कार्यालयात व्यवस्थापक म्हणून काम करतात. पंढरपूर बॅंकेच्या संपूर्ण राज्यात 30 शाखा आहेत. बारामती येथे भिगवण रस्त्यावर जळोची येथेही एक शाखा आहे. तेथे अमित देशपांडे हे शाखाधिकारी म्हणून काम करत आहेत. बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विरधे यांनी ताळेबंदपत्रकाचे अवलोकन केले असता बारामती शाखेत संशयास्पद व्यवहार होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी फिर्यादीला या संदर्भात तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तपासणी केली असता त्यात ही बाब स्पष्ट झाली आहे.
देशपांडे यांनी पदाचा गैरवापर करत तसेच कॅशिअर कम क्लार्क साधना कळंत्रे यांच्या कोडचा वापर करत बनावट कागदपत्रे तयार केली. ती खरी असल्याचे भासवत बॅंकेत अपहार व अफरातफर केली. बारामती शाखेच्या सस्पेन्स रिसिव्हेबल खात्यातून अधिकार नसताना 2 कोटी 30 लाख रुपये परस्पर उचल करून ती त्यांनीच उघडलेल्या धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्थेच्या खात्यात टाकली. बॅंक ऑफ बडोदा येथे भरणा करण्यासाठी 31 लाख रुपये काढत त्या रकमेची परस्पर विल्हेवाट लावली आहे. धन्वंतरी पतसंस्थेच्या नावे 5 बनावट ओडीटीडीआर खाते उघडून त्यातील 3 कोटी 23 लाख 71 हजार 897 रुपये स्वःतच्या फायद्यासाठी वापरले आहेत.
तसेच बारामती शाखेतील ग्राहकांचे सोने तारण कर्ज खाते प्रकारामध्ये 83 खातेदारांचे बॅंकेत ठेवलेले खरे दागिने काढून तेथे बनावट दागिने ठेवले असून खरे दागिने बाहेरील फायनान्स कंपन्यांना देत त्यावर कर्ज काढले आहे. 10 ग्राहकांच्या नावे बनावट खाती काढली आहेत. त्यावर बनावट सह्या करून त्या खात्यावर कर्ज वितरित केल्याचे व त्या बदल्यात सोने ठेवल्याचे दाखवून त्यांच्या नावे बॅंकेत बनावट सोने ठेवले आहे. त्याद्वारे 37 लाख 56 हजार 803 रुपये स्वतःसाठी वापरले आहेत.
बॅंकेतील सोने तारण कर्ज खाते प्रकारामध्ये 3 कोटी 18 लाख 37 हजार 464 रुपयांचा अपहार केला आहे. असा एकूण 9 कोटी 3 लाख 361 रुपयांचा अपहार करत बॅंकेची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक विलास नाळे पुढील तपास करीत आहेत.