टीम लोकमन मंगळवेढा |
ज्येष्ठ नेते शरद पवार हे महाविकास आघाडी मधीलच आपला मित्रपक्ष असलेल्या शिवसेना उबाठा गटाला धक्का देणार का? अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत. याला कारण ठरलंय शरद पवार यांनी घेतलेली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील एका बड्या नेत्याची भेट.
सोलापूर दौऱ्यामध्ये शरद पवार यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी मंत्री दिलीप सोपल यांची भेट घेतली आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये दिलीप सोपल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेच्या धनुष्यबाणावर बार्शीची विधानसभा निवडणूक लढली होती.
गेल्या पाच वर्षांपासून दिलीप सोपल हे शिवसेना पक्षापासून अलिप्त आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि दिलीप सोपल यांची भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. बार्शी विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीमधील शरद पवारांच्या पक्षाला सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिलीप सोपल शरद पवारांच्या पक्षात जायच्या तयारीत आहेत का आणि त्यातूनच ही भेट झाली आहे का? अशा चर्चांना आता उधाण आले आहे. दिलीप सोपल हाती तुतारी घेणार असल्याच्या चर्चांही आता जिल्ह्यात जोर धरू लागल्या आहेत.
शरद पवार हे शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने बार्शी दौऱ्यावर आले होते त्यावेळी त्यांनी दिलीप सोपल यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दिलीप सोपल अनेक वर्ष शरद पवारांचे सहकारी राहिले आहेत. मात्र मागच्या विधानसभा निवडणुकीत सोपल यांनी शरद पवारांची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर दिलीप सोपल आणि शरद पवार यांची पहिल्यांदाच बार्शीमध्ये भेट झाली आहे.
बार्शी हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. 2014 च्या मोदी लाटेतही शरद पवार यांनी हा गड राखला होता. मात्र आमदार दिलीप सोपल यांनी 2019 च्या निवडणुकीआधी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सोपल यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. तर राष्ट्रवादीने निरंजन भूमकर या तरुण व नवख्या चेहऱ्याला बार्शीतून संधी दिली होती. या दोन्ही उमेदवारांना अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता.